‘मिर्झापूर’ या वेबसीरीजमधून लोकप्रियता मिळालेला अभिनेता दिव्येंदू शर्मा अनेकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. त्याने आपल्या अभिनयाच्या शैलीतून अनेकांची मने जिंकली आहेत. त्याने नुकतंच एक ट्विट केलं आहे. ज्यामुळे आता तो चांगलाच चर्चेत आला आहे.

दिव्येंदूने नुकतंच एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये तो म्हणतो, “सर्व काही पुढे ढकललं जातं. पण राजकीय सभा नाही. मला वाटतं ते अत्यावश्यक सेवेत येत असावं.”

त्याच्या या ट्विटला अनेक रिप्लाय येत आहेत. अगदी कमी वेळात अनेकांनी त्याचं हे ट्विट रिट्विट केलं आहे. तर अनेकांनी त्याच्या विचारांना सहमती दर्शवली आहे. काही वेळापूर्वीच बातमी आली की, सीबीएससी बोर्डाच्या दहावीच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या असून बारावीच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्या संदर्भात त्याचं हे ट्विट असावं असा प्राथमिक अंदाज लावता येईल.

त्याच्या अनेक चाहत्यांनी हे बोलून दाखवल्याबद्दल त्याचं अभिनंदन आणि कौतुक केलं आहे. एक युजर म्हणतो, “आंबेडकर जयंतीला आपल्या बोलण्याच्या अधिकाराचा चांगला उपयोग केला आहे.” तर एक युजर म्हणतो, “असे नेते लोकांसाठी काही चांगलं कसं करु शकता जे त्यांना अशा भयानक महामारीत प्रचारसभांमध्ये मोठ्या संख्येने सामील करून घेत आहेत?”

एक युजर म्हणतो, “आता बुद्धिजीवी लोकांना समोर यायला हवं. पण वाईट गोष्ट ही की कोणी बोलतच नाही. पण मला अभिमान आहे की तुमच्यासारखे खरे सुपरस्टार बोलत आहेत. बाकी त्या खोट्या स्टार्सची आता किळस येऊ लागली आहे.” अनेकांनी देशातली करोनाची आकडेवारीही पोस्ट केली आहे.

दिव्येंदू शर्माने ‘मिर्झापूर’ या वेबसीरीजमधून लोकांचं दीर्घकाळ मनोरंजन केलं आहे. त्याची मुन्नाभैय्या त्रिपाठी ही भूमिका अनेकांच्या चर्चेचा, मीम्सचा त्याचसोबत कौतुकाचा विषय ठरली. त्याच्या या ट्विटवर कमेंट करतानाही अनेकांनी त्याला मुन्नाभैय्या असंच संबोधलं आहे. त्याने ‘प्यार का पंचनामा’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ‘बत्ती गुल मीटर चालू’, ‘चश्मेबद्दुर’ अशा चित्रपटांमध्ये कामही केलं आहे.