सर आर्थर कॉनन डॉयल यांनी निर्माण केलेला शेरलॉक होम्स हा जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय डिटेक्टिव्ह आहे. पुढे त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवत डिटेक्टिव्ह कॉनन आणि डिटेक्टिव्ह डी यांसारख्या व्यक्तिरेखा निर्माण करण्यात आल्या, परंतु होम्सइतके यश त्यांना मिळवता आले नाही. पण क्वीन ऑफ क्राइम अगाथा ख्रिस्तीने निर्माण केलेल्या हर्क्युल पायरोने प्रसिद्धी आणि लोकप्रियता या दोन्ही पातळ्यांवर शेरलॉक होम्सच्या अस्तित्वाला आव्हान दिले. याच हर्क्युल पायरोचा मर्डर ऑन द ओरिएंट एक्स्प्रेस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या इंटरनेटवर धुमाकूळ माजवत असून ४,३११,७११पेक्षा जास्त लोकांनी तो पाहिला आहे. दिग्दर्शक केनेथ ब्रॅनाग याने जॉनी डेप, विल्यम डफे, जुडी डेंच, पेनेलोप क्रूज, डेसी रिडले, डेरेक जेकोबी, मिचेल पीफेफर या हॉलीवूड सुपरस्टार कलाकारांची फौज चित्रपटात उभारली असुन केनेथ हा स्वत: हर्क्युल पायरो हे पात्र साकारणार आहे. ३००हून अधिक कथा लिहणाऱ्या अगाथा ख्रिस्तीच्या सर्वात गाजलेल्या कथांपैकी एक मर्डर ऑन द ओरिएंट एक्स्प्रेस या कादंबरीवरून चित्रपटाची पटकथा तयार करण्यात आली आहे. याआधी या कथेवर आधारित ऑडिओ बुक, नाटक, मालिका आणि चित्रपट तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही कथा जवळजवळ सर्वाच्याच परिचयाची आहे.कथा फार साधी आहे. ओरिएंट एक्स्प्रेस नावाच्या रेल्वेत एक शिक्षक आणि त्याचा साहाय्यक, एक विधवा बाई, डॉक्टर, मिशनरी, बटलर, व्यापारी, एक राजकुमारी व तिची दासी आणि एक शिक्षिका हे १० जण प्रवास करत असतात. दरम्यान त्यांच्यापैकी एकाचा खून होतो. आणि हा खून कोणी केला आहे. याचा शोध डिटेक्टिव्ह हर्क्युल पायरो घेत असतो.दिग्दर्शक केनेथ ब्रॅनाग याच्या मते हा चित्रपट त्याच्या आयुष्यातील आजवरचे सर्वात मोठे आव्हान आहे. कारण एक उत्कृष्ट चित्रपट तयार करण्यासाठी उत्तम दर्जाची कथा तयार करावी लागते. आणि रहस्यकथेवर आधारित चित्रपटात तर कथेचे महत्त्व अधिकच होते. कारण यांत धक्कातंत्र वापरण्यासाठी कथा प्रेक्षकांपासून अज्ञात असणे अपेक्षित असते. आणि या चित्रपटाची पटकथा सिनेमा पाहणाऱ्या जवळजवळ प्रत्येक प्रेक्षकाला माहीत असणार आहे. त्यामुळे दिग्दर्शकासमोरील आव्हान अधिक तीव्र होत जाते. चित्रपटातील कलाकारांच्या मते यात प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारी वळणे आहेत. कथेचे स्वरूप पूर्णत: बदलले असून मूळ कथा आणि चित्रपट यांत खूप फरक असणार आहे.