‘द क्वीन ऑफ क्राइम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लेखिका अगाथा ख्रिस्तीच्या कादंबरीवर आधारित ‘मर्डर ऑन द ओरिएंट एक्स्प्रेस’ या चित्रपटाने पहिल्या आठवडय़ात ६.५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची कमाई केली आहे. दिग्दर्शक केनेथ ब्रॅनाग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यांत जॉनी डेप, विल्यम डफे, जुडी डेंच, पेनेलोप क्रूज, डेसी रिडले, डेरेक जेकोबी, मिचेल पीफेफर या हॉलीवूड सुपरस्टार कलाकारांची फौज आहे. ‘मर्डर ऑन द ओरिएंट एक्स्प्रेस’ या कादंबरीवरून चित्रपटाची पटकथा तयार करण्यात आली. याआधी या कथेवर आधारित ऑडिओ बुक, नाटक, मालिका आणि चित्रपटांची निर्मिती झालेली असतानाही पुन्हा एकदा त्याच कथेवर आधारित आणखी एका चित्रपटाची निर्मिती अनेकांना गोंधळात टाकणारी होती, कारण कोणत्याही रहस्यकथेवर आधारित चित्रपटात कथेला एक विशेष महत्त्व असते. पण त्या कथेचा शेवटच जर जगजाहीर असेल तर मात्र त्या चित्रपटाला काहीही अर्थ उरत नाही. कारण पैसे खर्च करून सिनेमागृहात जाण्याजोगे त्या कथानकात काहीच उरलेले नसते. पण या चित्रपटाला मिळालेला भरभरून प्रतिसाद पाहता अगाथा ख्रिस्तीच्या लिखाणाची चाहत्यांच्या मनावरील घट्ट पकड प्रकर्षांने जाणवते. आणि म्हणूनच निर्माते केनेथ ब्रॅनाग यांनी ‘डिटेक्टिव्ह हर्क्युल पायरो’ या व्यक्तिरेखेभोवती फिरणारी एक चित्रपट मालिकाच तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘शेरलॉक होम्स’ नंतर जगात सर्वात जास्त गाजलेल्या ‘हर्क्युल पायरो’ या व्यक्तिरेखेवर याआधी ३०हून अधिक यशस्वी चित्रपटांची निर्मिती झालेली आहे. केनेथ ब्रॅनाग यांच्या मते अगाथा ख्रिस्तीच्या सर्वच कथा या उत्कंठावर्धक आहेत. त्यांच्यावर काळाचे बंधन नाही. त्यामुळे त्यात थोडाफार बदल करून कोणत्याही कालखंडात त्यावर एक उत्तम चित्रपट तयार करता येऊ शकतो. तसेच इंटरनेट व समाजमाध्यमांच्या काळात आजची तरुण पिढी वाचन संकृतीपासून दूर गेल्याचे दिसते. त्यांना पुन्हा पुस्तकांच्या दिशेने वळवायचे असल्यास शेरलॉक होम्स व हर्क्युल पायरो यांचे चित्रपट एक उत्तम माध्यम होऊ शकते. किमान ते चित्रपट पाहून त्या व्यक्तिरेखांच्या प्रेमात ते पडतील आणि त्यांच्यावरील पुस्तके वाचण्यास ते प्रेरित होतील. म्हणून ब्रॅनाग यांनी चित्रपटमालिका निर्मितीचा निर्णय घेतला असे स्पष्टीकरण दिले.