मकरंद देशपांडे दिग्दर्शित ‘सॅटर्डे  सण्डे’ हा मराठीतला पहिला गँगस्टर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. हिंदीच्या तोडीचा ‘फुल ऑन ड्रामा’ असलेल्या या सिनेमात मुरली शर्मा हा हिंदी  अभिनेता एनकाउंटर स्पेशालिस्टच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘गोलमाल सिरिज’, ‘सिंघम’, ‘ओह मॉय गॉड’, ‘चक्रव्यूह’ या सारख्या अनेक हिंदी सिनेमांमध्ये आपल्या भूमिकांनी वेगळी ओळख निर्माण करणारा हा अभिनेता मराठीत प्रथमच एनकाउंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारतोय.     
हिंदी सोबत तामिळ, तेलगु, मल्याळम आणि मराठी अशा प्रादेशिक सिनेमांमध्ये मुरली शर्मा यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. विविधरंगी चरित्र  भूमिका मुरली यांनी आपल्या वेगळ्या लूकमुळे आणि अभिनयामुळे प्रभावीपणे  साकारल्या असून मकरंद देशपांडे दिग्दर्शित  ‘सॅटर्डे  सण्डे’  मध्ये एनकाउंटर स्पेशालिस्ट बी. वाय वर्मा ही व्यक्तिरेखा साकारत आहे.  बी. वाय वर्मा यांची  जनसामान्यात धडाडीचा अधिकारी अशी  प्रतिमा आहे.  ४२  कुविख्यात गुन्हेगारांना यमसदनी धाडणाऱ्या  या  एनकाउंटर स्पेशालिस्टचा गुन्हेगारी जगतात जबरदस्त  वचक आहे.  सोमवारचा दिवस पहायचा असेल तर आपआपसातील दुश्मनी बाजूला ठेवून शनिवार – रविवार एकत्र जमण्यासाठी  राज्याच्या गृहमंत्र्यांच्या पीए कडून निरोप येतो. त्यानंतर घडणाऱ्या रणधुमाळीत नक्की काय घडतं? याची खिळवून ठेवणारी कथा म्हणजे..  ‘सॅटर्डे  सण्डे’  हा चित्रपट. यात मुरली शर्मा साकारीत असलेला रोल महत्त्वपूर्ण असून प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीचा थरारपट पहायला मिळणार  आहे.  या चित्रपटाच्या अलीकडेच  प्रदर्शित करण्यात आलेल्या  फर्स्ट लूकला हिंदीतील नामांकित दिग्दर्शक अनुराग कश्यप, निर्माते विपूल शहा यांची देखील दाद मिळाली आहे. 
     
मुरली शर्मा यांची एनकाउंटर स्पेशालिस्टची भूमिका असलेल्या या चित्रपटात मकरंद देशपांडे, नागेश भोसले,  नेहा जोशी, अमृता सुभाष, अमृता संत, असीम हट्टंगडी, संदेश उपशम,  उमेश जगताप,  मुझामिल कुरेशी, इम्रान शेख, विक्रम दहिया, नचिकेत पूर्णपात्रे, शैलेश हेजमाडी, श्रेयस पंडीत, अजय मोर्या  या कलाकारांच्या भूमिका आहेत. गुन्हेगारी जगताचा वेध घेणारा    ‘सॅटर्डे  सण्डे’  ८ ऑगस्टला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय.