हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या सहस्रचंद्रदर्शन वर्ष सोहळ्याच्या निमित्ताने  मुंबईत येत्या ४ आणि ५ जून रोजी ‘सहस्रचंद्र स्वरनृत्य प्रभा’या संगीत व नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रम होणार आहेत.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात डॉ. प्रभा अत्रे यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी ‘स्वरमयी’तर्फे हा महोत्सव होणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने डॉ. अत्रे यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या काही सुधारित आवृत्यांचे, त्यांच्या पुस्तकांच्या हिंदी व इंग्रजी अनुवादाचे तसेच त्यांनी गायलेल्या रागांच्या ध्वनिफीतीचे प्रकाशनही या वेळी करण्यात येणार आहे.

पं. अजय पोहनकर, पं. व्यंकटेश कुमार, धनश्री पंडित-राय, साधना सरगम, आनंद भाटे, झेलम परांजपे हे मान्यवर डॉ. प्रभा अत्रे यांनी संगीतबद्ध केलेल्या काही रचना महोत्सवात सादर करणार आहेत. माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव, शेखर सेन यांच्या हस्ते पुस्तकांचे तसेच ध्वनिफीतींचे प्रकाशन होणार आहे. यात ‘स्वररंगी’, ‘स्वरमयी’, ‘सुस्वराली’, ‘स्वरांगिनी’, ‘अंत:स्वर’, ‘स्वरंजनी’ ही मराठी पुस्तके तसेच या पुस्तकांच्या हिंदी व इंग्रजी अनुवादांचा तसेच प्रभा अत्रे यांनी गायलेल्या काही रागांच्या ध्वनिफीतींचा समावेश आहे. येत्या २१ मे रोजी यशवंतराव चव्हाण नाटय़ मंदिर, पुणे येथे ‘स्वरप्रभा संगीत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. जयतीर्थ मेवुंड आणि पं. रघुनंदन पणशीकर यात सहभागी होणार आहेत. तसेच डॉ. प्रभा अत्रे यांची प्रकट मुलाखतही या वेळी होणार असून डॉ. विकास कशाळकर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.