ग. दि. माडगूळकर यांचे शब्द आणि सुधीर फडके यांचे संगीत-स्वर याचे गारूड आजही मराठी मनावर कायम आहे. माडगूळकर आणि फडके यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ज्येष्ठ रंगकर्मी आणि माजी नाटय़ व्यवस्थापक अशोक मुळ्ये यांनी शिवाजी मंदिर येथे ‘गाणी दोघांची’ हा कार्यक्रम नुकताच आयोजित केला होता.

श्रीरंग भावे, जयंत पिंगुळकर, अद्वैता लोणकर, विद्या करलगीकर यांनी गदिमा-सुधीर फडके यांची काही गाजलेली गाणी सादर केली. मिलिंद कुलकर्णी यांनी निवेदनातून गदिमा आणि सुधीर फडके यांचा सांगीतिक प्रवास उलगडला. कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळीत यांचे तर प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची होती.

मराठी चित्रपट संगीतातील या दोन दिग्गजांना सांगीतिक आदरांजली आणि त्यांच्या गाण्यांचे स्मरणरंजन करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला होता, असे मुळ्ये यांनी सांगितले.

‘बाळूमामांचं जीवन महाकाव्य’

‘कलर्स मराठी’ वाहिनीवर गेल्या आठवडय़ात संत बाळूमामा यांचे जीवन चरित्र उलगडणारी नवी मालिका सुरू झाली आहे. अकोळ या गावात बाळूमामांचा जन्म झाला. बाळूमामांची आई विठ्ठलभक्त होती. ती त्यांच्या जीवनप्रवासात खंबीरपणे उभी राहिली. आईने बाळूमामांना कसं घडवलं? आईबरोबर त्यांचं नातं कसं होतं? देवऋषी आणि बाळूमामा यांच्यामधील संघर्ष कसा होता.. हे सगळं प्रेक्षकांना या मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे.

मालिकेचे दिग्दर्शक संतोष अयाचित म्हणाले, ज्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचले नाही अशा अनेक व्यक्ती, महात्मे महाराष्ट्रात आहेत. त्यातील एक व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळूमामा. १८९२ मध्ये त्यांचा जन्म झाला. संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक त्यांनी मेंढरासोबत पायी फिरून पिंजून काढला. अनेक जाती-धर्माच्या माणसांचे आयुष्य त्यांनी बदलले. त्यांचे हे कार्य एका महाकाव्यासारखं आहे. एक वेगळा काळ, वेगळी पात्रं असलेली ही मालिका आहे. वाट चुकलेल्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि त्यांच्या शंकांचे निरसन करणारे बाळूमामा हे मोठे संत होते.

तुम्ही माझ्याकडे येऊ  नका, मी तुमच्याकडे येतो, असं सांगून हजारो लोकांना आधार देणाऱ्या बाळूमामांचे चरित्र या मालिकेतून पाहायला मिळणार आहे.