‘इंद्रधनु’ रंगोत्सवात गझल, लोकगीते, चित्रपटगीतांचे सादरीकरण

इंद्रधनु आयोजित रंगोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गानसरस्वती किशोरीताई आमोणकर आणि ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. डी. के. दातार यांचे शिष्य असलेले पं. मिलिंद रायकर यांच्या संकल्पनेतून साकरालेला ‘टुगेदरनेस’ हा आगळावेगळा कार्यक्रमाचा आस्वाद ठाणेकरांना अनुभवायला मिळाला.
मुग्धा वैशंपायनचे गायन आणि यज्ञेश रायकरचे व्हायोलिनवादन, अशी ही सुरांची मैफल होती. कार्यक्रमाची सुरुवात बागेश्री रागाने करून ‘होठों से छुलो तुम’, ‘चुपके चुपके’ या गझला सादर करण्यात आल्या. पं. भीमसेन जोशी आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अजरामर केलेल्या ‘बाजे मुरलिया बाजे’ या गाण्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
‘केसरीया बालमा’, ‘सुन मेरे बंधू रे’ अशा अनेक लोकसंगीतावर आधारित रचना; ‘हे सुरांनो चंद्र’ व्हा आणि ‘झाले युवतीमना’ ही नाटय़पदे; ‘याद पिया की आए’, ‘सावरे ऐ जैयो’ सादर करताना डॉ. वसंतराव देशपांडे, बडे गुलाम अली खान अशा थोर कलाकारांची आठवण कार्यक्रमात झाली.
‘चांद और सवेरा’ या चित्रपटातील ‘सिंध भैरवी’तील ‘अजहून आये’ हे गाणे सादर करून दोन्ही कलाकारांनी हिंदी सिनेसंगीताचे सुवर्णयुग उलगडले. हेमंत, भीमपलास, देस अशा विविध रागांमधील गाण्यांवर आधारित रागमाला कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. पं. कालीनाथ मिश्रा, सत्यप्रकाश मिश्रा, सुधांशु घारपुरे, मुग्धा वैशंपायन आणि यज्ञेश रायकर यांच्या सादरीकरणातून वादन आणि गायन यांची जुगलबंदी प्रेक्षकांना अधिक भावली.