सितारवादक पंडित कार्तिककुमार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त अनोखी मैफल

चार तरुण तबलावादक आणि स्वत: युवा सितारवादक नीलाद्रीकुमार यांच्या साथीने एक अनोखी संगीत मैफल मुंबईत रंगणार आहे. ख्यातनाम सितारवादक पंडित कार्तिककुमार यांच्या ८० व्या वाढदिवसाची भेट म्हणून त्यानिमित्ताने त्यांचे सुपुत्र नीलाद्रीकुमार यांनी खास या आगळ्यावेगळ्या मैफलीचे आयोजन केले आहे. ‘स्वस्तिक’ नावाने रंगणाऱ्या या संगीत सोहळ्यात नीलाद्रीकुमार यांच्याबरोबर सत्यजित तळवलकर, आदित्य कल्याणपूर, ओजस अधिया आणि शुभ महाराज या तबलावादकांचा महत्त्वाचा सहभाग आहे.

‘स्वस्तिक’ हा आजच्या पिढीच्या युवकांनी केवळ इतर संगीत प्रकारांना चिकटून न राहता भारतीय शास्त्रीय संगीताच्या उंची परंपरेची ओळख करून घ्यावी आणि त्यात त्यांना रुची निर्माण व्हावी म्हणून केलेला प्रयत्न आहे. ‘ए फिल्ड प्रॉडक्शन’ आणि नीलाद्रीकुमार यांनी एकत्रितपणे ‘स्वस्तिक’चे आयोजन केले असून विलेपाल्रे येथील नटवर्य दत्ता भट मार्गावरील ‘दीनानाथ मंगेशकर नाटय़गृह’ येथे रात्री ८.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ‘स्वस्तिक’ हा अनोखा रागांचा उत्सव आहे. याआधी माझ्या वडिलांसाठी मी कोणताही कार्यक्रम केलेला नाही. ते माझे गुरू आहेत. त्यामुळे त्यांना समर्पित असा हा कार्यक्रम माझ्या वडिलांसाठी आणि रसिकांसाठी अविस्मरणीय व्हावा, असा आपला प्रयत्न असल्याचे नीलाद्रीकुमार यांनी सांगितले.

या संगीत मैफलीत सहभागी होणारे चारही तबलावादक हे चार वेगवेगळ्या घराण्यांचे आहेत. मी स्वत: त्यांच्या साथीने चार राग आणि चार रचना वाजवणार आहेत. त्या चौघांच्याही तबलावादनाची शैली वेगवेगळी असल्याने नक्कीच सितार आणि तबल्याच्या या सुरांची अनोखी मैफल रसिकांना अनुभवता येईल यात शंका नाही, असे सांगतानाच या मैफलीत निश्चित कार्यक्रम सादर झाल्यानंतर आणखी काही वेळ मिळाल्यास एक वेगळा प्रकार रसिकांसमोर सादर करायचा आहे, असेही नीलाद्रीकुमार यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका www.bookmyshow.com वर उपलब्ध आहेत. याशिवाय, कार्यक्रमाबद्दलच्या अधिक माहितीसाठी ९७६९५९९९५६ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.