संगीतकार आणि ‘डॉन स्टुडिओज’चे संचालक नरेंद्र भिडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘नदी वाहते’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी पैसे बुडवल्याचा आरोप केला आहे. तंत्रज्ञ आणि कलाकारांना चित्रपट प्रदर्शनानंतरही पैसे न मिळाल्याने त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत वाचा फोडली आहे. नरेंद्र भिडेंच्या ‘डॉन स्टुडिओज’ने ‘नदी वाहते’ चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम केलं होतं.

‘कधीही न आटणारी, तंत्रज्ञ आणि कलाकारांना त्यांच्या पैशासकट बुडवून दिमाखात वाहणारी नदी,’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. यासंदर्भात ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना भिडे म्हणाले, ‘संदीप सावंत यांच्याशी असलेले जुने संबंध लक्षात घेता मी ऐनवेळी नदी वाहते चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम स्वीकारलं होतं. सप्टेंबर २०१७ मध्ये माझ्या डॉन स्टुडिओजने हे काम पूर्ण केलं. तेव्हा पाच दिवसांत मी पैसे देतो असं आश्वासन सावंत यांनी दिलं होतं. जवळपास दीड लाख रुपये त्यांनी थकवले आहेत. त्यांनी दिलेले चेकसुद्धा बाऊन्स झाले. अखेर इतरांना अशा घटनांपासून सावध करण्यासाठी मी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.’

यासंदर्भात दिग्दर्शक संदीप सावंत यांची बाजू जाणून घेण्यासाठी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ त्यांच्याशी संपर्क केला. ‘डॉन स्टुडिओजचे ५० टक्के पैसै परत केले आहेत आणि ५० टक्के राहिले आहेत. मुळात नदी वाहते हा व्यावसायिक चित्रपट नाही. त्यातून फारशी कमाईदेखील झाली नाही. राज्यात मोजक्या चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता आम्ही इतर माध्यमांद्वारे पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. चित्रपटाचे हक्क विकण्याचा आमचा विचार सुरू आहे. त्यानुसार आम्ही पैसे परत करू. पैसे बुडवण्याचा आमचा कोणताच उद्देश नाही,’ असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

‘नदी वाहते’ हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘श्वास’ चित्रपट फेम दिग्दर्शक संदीप सावंत यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. तर संदीप सावंत, नीरजा पटवर्धन यांच्या ‘सहज फिल्म्स’ने चित्रपटाची निर्मिती केली होती. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि झी गौरव पुरस्कारांत या चित्रपटाला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

मोर्चे काढून, आंदोलने करून नदी वाहत नाही. ती वाचविण्यासाठी तिचा योग्य तोच वापर करायला हवा. विकासासाठी छोटी नदी वाचवायला हवी, तीही तिच्या उपयोगातूनच असं या ‘नदी वाहते’ चित्रपटात अधोरेखित करण्यात आलं आहे.