करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने बॉलिवूडला हादरून टाकलं आहे. आता पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूड लोकप्रिय संगीतकारांच्या जोडींपैकी एक म्हणजे नदीम- श्रवण यांची जोडी. यातील संगीतकार आणि दिग्दर्शक श्रवण राठोड यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

अनिल यांच हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. ‘फारच वेदनादायी अशी बातमी… प्रसिद्ध संगीतकार श्रवण यांचे करोनामुळे निधन झाले आहे. ते माझे खूप चांगले मित्र होते. आम्ही ‘महाराजा’ मध्ये एकत्र काम केलं होतं. त्यांनी नेहमीच उत्तम संगीत दिलं. त्यांच्या कुटुंबियांना धैर्य मिळावं हीच प्रार्थना. श्रवण नेहमीच आमच्या हृदयात जिवंत राहतील,’ अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.

त्यांच्या ट्वीटनंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट करत श्रवण यांच्यां निधनाचं दुख: व्यक्त केलं आहे. ‘संपूर्ण संगीत समुदाय आणि तुमच्या चाहत्यांच्या आठवणीत तुम्ही नेहमी रहाल, श्रवण राठोड जी तुमच्या आत्माला शांती मिळो,’ अशा आशयाचे ट्वीट ए आर रहमान यांनी केले आहे.

कुमार सानु यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून श्रवण यांचा फोटो शेअर केला आणि म्हणाले, “माझा अत्यंत प्रिय मित्र श्रवणजी बद्दल हृदयस्पर्शी बातमी …. माझ्याकडे शब्द नाहीत !! देव त्यांच्या कुटुंबाला शक्ती देवो.”

अनेक गायक आणि संगीतकारांना ट्वीट केले आहे.

श्रवण राठोड यांच्याशिवाय त्यांची पत्नी आणि मुलगा संजीव राठोड हे करोना पॉझिटिव्ह आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांना एस. एल. रहेजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. श्रवण यांना करोनाबरोबरच इतर अनेक आजार असल्याने त्यांची प्रकृती नाजूक होती. श्रवण यांच्यावर डॉ. किर्ती भूषण हे उपचार करत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रवण हे व्हेंटिलेटवर होते. तिथेच गुरुवारी २२ एप्रिल रोजी रात्री ९.३० मिनिटांची त्यांनी शेवटचा श्वास घेतला श्रवण यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा अंत्यसंस्कारात सामील होऊ शकले नाही.

नदीम- श्रवण यांनी ‘आशिकी’नंतर, ‘साजन’, ‘सडक’, ‘दिल है की मानता नही’, ‘साथी’, ‘दिवाना’, ‘फूल और काँटे’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘जान तेरे नाम’, ‘रंग’, ‘राजा’, ‘धडकन’, ‘परदेस’, ‘दिलवाले’, ‘राज’ अशा अनेक चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले होते.