माझ्या नाटकाच्या यशामध्ये गायनाचा मोठा वाटा आहे. १८ वर्षे संगीत नाटकात काम केले आणि ते यशस्वी झाले. या यशामध्ये संगीतातील अनेक गुरूंचे मार्गदर्शन आहे. संगीत नाटक हा माझा धर्म आहे आणि त्यात काम करणे हे माझे व्रत आहे. त्यामुळेच वैयक्तिक दु:ख प्रयोगाच्या आड कधी येऊ दिले नाही. आता जरी नाटकामध्ये काम करत नसलो, तरी नाटक व सुगम संगीताच्या प्रसाराचा प्रयत्न अखंड सुरू आहे. एकेकाळी सुवर्ण पताका फडकवलेली संगीत रंगभूमी सध्या मरगळलेल्या स्थितीत असून तिच्या पुनरुत्थनासाठी रसिकांचे आशीर्वाद हवेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ गायक पंडित रामदास कामत यांनी येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या सप्तरंग महोत्सवाच्या यावर्षीच्या शेवटच्या पर्वाला बुधवारी ठाण्यात सुरुवात झाली. डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात संगीताचार्य बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ गायक रामदास कामत यांना प्रदान करण्यात आला. तर नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांना सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना रामदास कामत यांनी आठवणींना उजाळा दिला.
नाटय़जीवन सुखी होते, त्यामुळे वैयक्तिक दु:खामध्ये गुरफटून राहात प्रयोग कधीच टाळले नाही. बालगंधर्वानी सुरू केलेल्या या परंपरेला जोपासण्याचा आपला कायम प्रयत्न राहिला. नटवर्य प्रभाकर पणशीकरांच्या नावाने पुरस्कार प्राप्त झाले हे माझे भाग्य आहे, या शब्दांत अरुण काकडे यांनी पुरस्काराला उत्तर दिले. प्रभाकर पणशीकर आणि आपण समन्वयक असलो तरी दोघांचे काम हे समांतर असेच चालणारे होते.
प्रभाकर पंतानी व्यावसायिक तर आपण प्रायोगिक नाटकांची निर्मिती केली. असा समांतर प्रवास चालत राहिला. पंतानी व्यावसायिक नाटके महाराष्ट्रातील खेडोपाडय़ात पोहचवली, तर प्रायोगिक नाटके महाराष्ट्रभर पोहचवण्याचा आपला कायम प्रयत्न राहिला. हा सारखा दुवा आपल्यामध्ये आणि पणशीकरांमध्ये राहिल्याचे काकडे यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्यमंत्री देवतळे यांनी मराठी चित्रपट, नाटके दर्जेदार बनत असून देखील रसिक त्याकडे पाठ फिरवत असल्याची खंत व्यक्त केली.
प्रायोगिक रंगभूमीच्या नाटकांचा महोत्सव..
मराठी रंगभूमीला चांगले कलाकार आणि रसिक मिळावेत या उद्देशाने यंदापासून प्रायोगिक रंगभूमीच्या नाटकांचा नाटय़ महोत्सव भरवण्याचा निर्णय यावेळी देवतळे यांनी जाहीर केला. नाटय़महोत्सवामध्ये सवरेत्कृष्ट १० नाटकांना व्यावसायिक नाटकांप्रमाणेच १५ हजारांचे अनुदान देण्यात येईल असे त्यांनी यावेळी जाहीर केले.