पुणेकर अभिनेता सिद्धार्थ मेनन अलाद्दिनच्या भूमिकेत

भारतात संगीत आणि नाटकांची परंपरा फार मोठी आहे. तसंच महाराष्ट्रात संगीत नाटकं शंभर वर्षांहून अधिक काळ होत आहेत. ब्रॉडवेवर होणारी संगीत नाटकं हा भारतीय रंगकर्मीसाठी खूप कुतूहलाचा विषय आहे. ब्रॉडवेवरचं नाटक म्हणजे भव्यदिव्य आणि ‘लार्जर दॅन लाइफ’ असा अनुभव. हा अनुभव प्रत्यक्ष घेण्याची संधी आता मिळणार आहे. कारण, ब्रॉडवेवर गाजलेलं ‘अलाद्दिन’ हे नाटक आता भारतीय रंगभूमीवर दाखल होत आहे. हे नाटक भारतीय कलाकारांसह नव्याने रंगभूमीवर येत आहे. त्यातही मराठी रंगभूमी आणि रंगकर्मीसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे पुणेकर अभिनेता सिद्धार्थ मेनन या नाटकात अलाद्दिन या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हे नाटक २० एप्रिलपासून मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट्स (एनसीपीए) येथे होणार आहे.

डिस्ने इंडिया आणि बुक माय शो यांनी या भव्यदिव्य नाटकाची निर्मिती केली आहे. नाटकाचं दिग्दर्शन श्रुती शर्मा, नृत्यदिग्दर्शन शम्पा गोपीकृष्ण आणि बर्टविन डिसूझा, संगीत दिग्दर्शन ध्रुव घाणेकर करत आहे. नाटकात सिद्धार्थ मेननसह तारूक रैना, कायरा नारायणन, विक्रांत चतुर्वेदी असे जवळपास पन्नास कलाकार आहेत. एकूण सहा हजार कलाकारांतून पन्नास कलाकारांची नाटकासाठी निवड करण्यात आली.  सिद्धार्थनं आंतरमहाविद्यालयीन नाटकांपासून हिंदी सिनेमापर्यंतचा प्रवास केला आहे. त्यात ‘गेली एकवीस र्वष’, ‘संगीत संशयकल्लोळ’ अशा अनेक नाटकांचा समावेश आहे. अभिनेता म्हणून त्यानं स्वत:चा ठसा उमटवला आहे.

सिद्धार्थ डिस्नेच्या अलाद्दिन या अ‍ॅनिमेशनपटाचा लहानपणापासून चाहता आहे. त्यामुळे अलाद्दिन या नाटकात अलाद्दिनची भूमिका साकारण्याची संधी त्याच्यासाठी फारच आनंददायी आहे. अलाद्दिन या नाटकासाठी देशभरात निवड चाचणी घेण्यात आली होती. या निवड चाचणीसाठी मलाही बोलावण्यात आलं. आजपर्यंत मी अनेक निवड चाचण्यांना गेलो आहे, मात्र अलाद्दिनच्या निवड चाचणीचा अनुभव फारच वेगळा होता. बऱ्याच फेऱ्या झाल्यानंतर अलाद्दिनच्या मुख्य भूमिकेसाठी माझी निवड झाल्याचं कळलं. तो क्षण माझ्यासाठी स्वप्न सत्यात आल्यासारखाच होता, असं सिद्धार्थनं सांगितलं.

अलाद्दिनची गोष्ट जवळपास प्रत्येकाला माहीत आहे. ही भूमिका खूपच आव्हानात्मक आहे, कारण गाणं गायचं, नाचायचं, अ‍ॅक्शन सीन्स करायचे, असं खूप काही एका वेळी करायचं आहे. आजपर्यंत रंगभूमीवर केलेल्या कामाचा या भूमिकेसाठी उपयोग होतोच आहे, मात्र अलाद्दिनचा हा अनुभव माझ्यासाठी आयुष्यभर पुरणारा आहे. आपल्या प्रेक्षकांना आजपर्यंत कधी अनुभवला नसेल, असा हा लार्जर दॅन लाइफ अनुभव ठरणार आहे, असंही सिद्धार्थ म्हणाला.

chinmay.reporter@gmail.com