संगीतकार मदन मोहन यांच्या अवीट गाण्यांची मोहिनी दादर आणि ठाण्यातील रसिकांनी पुन्हा एकदा अनुभवली. ‘स्वरगंधार’ आणि ‘लोकसत्ता’  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘अल्टीमेट मेलडीज ऑफ मदन मोहन’ ही संगीतमैफल ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह आणि प्रभादेवीतील रवींद्र नाटय़मंदिरात प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दीत रंगली. या कार्यक्रमाच्या ध्वनीफितीचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले. संगीत संयोजक अविनाश चंद्रचूड आणि व्हायोलिन, सॅक्सोफोन, मेंडोलिन, सितार, पियानो, गिटार अशा २५ वादकांच्या साथीने मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या गाण्यांची मैफल रंगली होती. ‘हिंदुस्थान की कसम’ या चित्रपटातील मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘है साथ तेरे मेरी वफा’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आणि त्यानंतर ‘माय री मै कासे कहूँ’, ‘कौन आया मेरे मन के द्वारे’,  ‘यँु हसरतों के दाग’, ‘जिया ले गयो जौ मोरा’, ‘तेरी आँखो के सिवा’, ‘वोह भूली दास्ताँ’ अशी एकेक मधुर गाणी सादर करण्यात आली.  ऋषीकेश रानडे, सोनाली कर्णिक, विद्या करलगीकर यांनी गायलेली ही अप्रतिम गाणी आणि त्याला अंबरीश मिश्रांच्या खुमासदार शैलीतील निवेदनाची लाभलेली साथ यामुळे मदन मोहन यांच्या संगीताने नटलेल्या या गाण्यांच्या मैफलीला प्रेक्षकांकडूनही ‘पुन्हा..पुन्हा’चा आग्रह होत होता, टाळ्यांच्या कडकडाटात गाण्यांना दाद मिळत होती. मान्यवरांनीही या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली होती. दादर येथील कार्यक्रमाला शर्मिला राज ठाकरे, आमदार नितीन सरदेसाई, किरण शांताराम आणि तौफिक कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते. तर ठाण्यात रंगलेल्या या कार्यक्रमात राज्य रस्ते विकास महामंडळाचे उप-संचालक आशुतोष राठोड आणि ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर उपस्थित होते. तुम जो मिल गए हो.. असे म्हणत रंगलेल्या या गाण्यांच्या कार्यक्रमाच्या शेवटी  ‘कै से कटेगी जिंदगी तेरे बगैर’ हे मदन मोहन यांनी संगीत दिलेले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात स्वरबध्द झालेले गाणे सादर करण्यात आले. या कार्यक्रमाला ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’, ‘एलआयसी’, ‘आयडीबीआय’, ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ आणि ‘इंडियन ऑईल कॉ. लिमिटेड’चे प्रायोजकत्व लाभले होते.