अभिजीत खांडकेकर
मी आणि माझी बायको सुखदा आम्ही दोघंही कामामुळे मुंबईत राहतो. पण, माझं घर नाशिकला असल्यामुळे तिथेच आम्ही गणपतीचा सण साजरा करतो. माझे आई-वडिल तिथे राहतात. आम्हाला कामामुळे जास्त वेळ देता येत नसल्यामुळे अगदी साधी पण मनाला भावेल अशी सजावट आम्ही करतो. प्रसन्न अशी गणपती बाप्पाची मूर्ती आमच्या घरी १० दिवसांसाठी विराजमान होते. गणेशोत्सवाची मला लहानपणापासूनचं आवड आहे. लहान असताना मंडळांमध्ये विविध स्पर्धा घेतल्या जायच्या. त्यात मी सहभाग घ्यायचो आणि निदान सात-आठ तरी बक्षिस पटकवायचो. लहानपणी या स्पर्धांमध्ये भाग घेतल्यांमुळेचं माझ्यातील कलागुणांना वाव मिळाला आणि अभिनयाचे गुणही तिथूनचं जोपासण्यास सुरुवात झाली. पण, आता मुलांच्या कलांना वाव देणा-या स्पर्धा कुठेतरी कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळतयं.
मी काही दिवसांपूर्वी नाशिकला तीन गणेशोत्सव मंडळांना भेट दिली होती. तेव्हा त्यांनी मला किती मानधन घेणार म्हणून विचारले. तर मी म्हणालो तुम्ही दुष्काळग्रस्तांसाठी काही करतायं का ते सांगा. तेव्हा त्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी धान्य पुरवठा करणारा असल्याचा खूप चांगला उपक्रम राबवत असल्याचं सांगितलं. दुष्काळग्रस्तांसाठी करण्यात येणारी मदत हेच माझं मानधन असेल, असे मी त्यांना म्हणालो. गणेशोत्सवात लाइटिंगवर हजारो रुपये खर्च केले जातात. तेच पैसे जर आपण गरिबांना दिले तर एका घरात चूल तरी जळू शकते, हाच संदेश मी त्यांना यावेळी दिला.