“मुंबईत बाइकवरून जाणाऱ्या दोघांनी मला बघून ‘करोना’ म्हणून हाक मारली.” असं वक्तव्य ‘इंडियन आयडॉल’ फेम गायक व अभिनेता मियांग चँग याने केलं होतं. हा धक्कादायक अनुभव त्याने एका व्हिडीओमार्फत प्रेक्षकांना सांगितला आहे.

काय म्हणाला चँग?

“माझं नाव चँग आणि मी करोना व्हायरस नाही. खरं तर असं वाक्य तुम्ही यापूर्वी शाहरुख खानच्या एका चित्रपटात ऐकलं असेल. परंतु त्या वाक्यात मी थोडासा फेरफार केला आहे. त्या दिवशी मुंबईत बाईकवरुन जाणाऱ्या दोघांनी मला ‘करोना’ अशी हाक मारली. मला ते ऐकून फार दु:ख झालं. जगभरात करोना विषाणूची दहशत पसरली असताना लोकांकडून किमान मी संवेदशनशील वागणुकीची अपेक्षा करतो” असा अनुभव त्याने या व्हिडीओमध्ये सांगितला आहे.

‘इंडियन आयडॉल ३’मध्ये चँगने भाग घेतला होता. हा शो तो जिंकू शकला नव्हता, मात्र त्यानंतर त्याला सूत्रसंचालनाची बरीच कामं मिळाली. चँगने ‘बदमाश कंपनी’, ‘सुलतान’, ‘भारत’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.