बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक, निर्माता करण जोहरच्या स्टुडण्ट ऑफ द इयर चित्रपटाने चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आता ३० क्लबमध्ये सामिल झाला आहे. सिद्धार्थ आता ३० वर्षांचा झाला असून, शाहिद कपूर, रणबीर कपूर आणि बॉलीवूडमध्ये वयाची तिशी ओलांडलेल्या अभिनेत्यांच्या यादीत आता त्याच्या नावाचाही समावेश झाला आहे.

बार बार देखो चित्रपट अभिनेता सिद्धार्थला तो आता वयाच्या मनोरंजक टप्प्यात असल्याचे वाटते. याविषयी एका वृत्तपत्राशी बोलताना सिद्धार्थ म्हणाला की, प्रत्येक मुलाच्या आयुष्यात हा एक मनोरंजक टप्पा असतो. आता मला अधिक आरामदायी वाटत आहे. काही गोष्टी या वयानुसार आणि अनुभवाने समजू लागतात. तुम्ही एकदा तिशीचे झालात की, आणखी जबाबदार आणि विश्वसनीय होता. मी जेव्हा या टप्प्यात प्रवेश केला तेव्हा मी संयमी झालो. पुढे तो म्हणाला की, एक व्यक्ती म्हणून मी चित्रपटाच्या सेटवर अतिशय व्यग्र असा असतो. थोडासाही विलंब झाला किंवा अडचणी आल्या की मी रागावतो. पण, आता अनुभवाने मला कळलंय की असंच चालतं. चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, कलाकार, निर्मात्यांसोबत आता माझं ब-यापैकी जमू लागलं आहे, याबद्दल मी स्वतःला नशिबवान समजतो.

[jwplayer 1pcQWXOd]

ंलग्नाविषयी सांगताना माझ्यावर आई-वडिलांकडून याकरिता कोणताही दबाव नसल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला की, लग्न करण्यासाठी माझ्या आई-वडिलांकडून माझ्यावर कोणताही दबाव नाही. निदान, अजूनपर्यंत तसं काही झालेलं नाही. माझे पालक निश्चितपणे उदारमतवादी आहेत. पण, माझ्या कोणत्याच भावंडांवर वयाच्या विशिष्ट टप्प्यावर आल्यावर लग्नासाठी किंवा कोणता व्यवसाय निवडावा यासाठी कधीच दबाव टाकण्यात आलेला नाही. माझी आई अजूनही मला विचारते, बाळा तू अजूनही काम करतोयस? आणि अजूनही ती माझे काम कसे चालू आहे, याविषयी काळजी करत असते. आयुष्यात स्थिरसावर होणं हे वेळेनुसार होत. मी अपेक्षा करतो माझी तिशी पूर्ण होईपर्यंत हे झालेलं असेल. निदान माझा तसा विचार तरी आहे.

सिद्धार्थने नुकतेच आगामी रिलोड चित्रपटाचे काम पूर्ण केले आहे. यात त्याच्यासोबत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसेल. ‘रिलोड’ चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, मिआमी आणि बँगकॉक येथे करण्यात आले आहे. या चित्रपटात सुनील शेट्टी, दर्शन कुमार यांच्याही भूमिका आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलीन फर्नांडिसची मुख्य भूमिका असलेला रिलोड या वर्षी २५ ऑगस्टला प्रदर्शित होईल.