अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाला अवघे काही दिवस राहिले आहेत. नोव्हेंबर १४ आणि १५ तारखेला बॉलिवूडमधल्या या बहुचर्चित जोडीचा विवाहसोहळा पार पडणार आहे. त्याची लगबग आता सुरू झाली आहे. नुकतंच रणवीर- दीपिकाने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या घरी जाऊन लग्नाचं आमंत्रण दिलं. भन्साळी हे दोघांचे आवडते दिग्दर्शक असून त्यांच्यासोबत दोघांनी बऱ्याचदा एकत्र काम केलं आहे. तर दुसरीकडे दिग्दर्शक रोहित शेट्टीने दीप- वीरला लग्नाच्या शुभेच्छा देत इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहिली.

रणवीर सिंग रोहितच्या आगामी ‘सिम्बा’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे आणि या चित्रपटाची शूटिंग नुकतीच पूर्ण झाली आहे. त्यानिमित्ताने रोहितने ही पोस्ट लिहिली आहे. ‘आजपासून पाच महिन्यांच्या अगोदर ६ जून २०१८ रोजी आम्ही ‘सिम्बा’चा प्रवास सुरू केला. आता जेव्हा सिम्बा म्हणजेच संग्राम भालेरावसोबतचा हा प्रवास संपला तेव्हा माझ्या मनात भावनांचा पूर आला. रणवीरसोबतचा हा माझा पहिला चित्रपट आहे आणि हा प्रवास अत्यंत रंजक, आठवणींनी भरपूर असा होता. इतक्या चांगल्या व्यक्तीसोबत माझी भेट झाली आणि हा माझा आतापर्यंतचा सर्वांत चांगला चित्रपट आहे. रणवीर आता त्याच्या आयुष्याची एक नवी सुरुवात करत आहे. माझा सिम्बा आणि माझी मीनम्मा विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघं नेहमी आनंदी आणि सुखी राहा,’ असं त्याने लिहिलं. दीपिकाने रोहित शेट्टीच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटात मीनम्माची भूमिका साकारली होती.

१४ नोव्हेंबरला दोघे पारंपारिक कोकणी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत. दीपिका कर्नाटकातील सारस्वत ब्राह्मण असून कोकणी तिची मातृभाषा आहे. १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने विवाह होईल. रणवीर सिंग सिंधी आहे. १६ तारखेला सर्व पाहुणे मायदेशी परततील. बॉलिवूडमधल्या आपल्या मित्र परिवारासाठी दोघांकडून एक डिसेंबरला मुंबईत भव्य स्वागतसोहळा आयोजित केला जाईल अशी चर्चा आहे.