करोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा केली. याचा फटका अनेकांना बसताना दिसत आहे. यामध्ये मालिका आणि चित्रपटांच्या निर्मात्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसत आहे. तसेच मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना देखील याचा फटका बसत आहे. नुकताच ‘नागिन ४’ मालिकेती अभिनेत्री सायंतनी घोषने घर चालवणे कठिण झाल्याचे सांगितले आहे.

सध्या कलाविश्वातील सर्व मालिका आणि चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकल्यामुळे छोट्या पडद्यावरील सगळ्या जुन्या मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली आहे. अशातच अभिनेत्री सायंतनी घोषच्या अडचणी वाढल्या आहेत. यासंदर्भात सायंतनीने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने, ‘लॉकडाउनमुळे माझ्यासमोर आर्थिक प्रश्न उभे राहिले आहेत. माझ्यासोबत अनेक कामगारांना देखील याचा सामना करावा लागत असेल. सध्या मालिकांचे चित्रीकरण बंद असल्यामुळे आम्ही घरातच आहोत. प्रत्येकाला पुन्हा कामावर रुजू होण्याची इच्छा आहे. आम्ही लवकरात लवकर काम सुरु होण्यासाठी प्रयत्न करत आहोत. पण हा सर्वांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. तसेच चित्रीकरणाच्यावेळी सोशल डिस्टंसिंग पाळणे खूप आव्हानात्मक ठरणार आहे’ असे सायंतनी म्हणाली.

‘अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाला पगार मिळायला हवा आणि पगार देण्यास कोणी नकार दिलेला नाही. पण ते पगार देणार कसे? ऑफिस बंद आहे. या परिस्थितीला सर्वांनाच समोरे जावे लागत आहे. माझे पैसे देखील अडकले आहेत. मला माझ्या घराचा आणि कारचा इएमआय भरायचा आहे. सरकारने २-३ महिन्यांसाठी यावर शिथिलता आणली आहे. पण मला माझे घर देखील चालवायचे आहे’ असे तिने पुढे म्हटले आहे.