देशाचे अन्नदाते असलेल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत, जलसंधारण, ठिबक सिंचन, घर बांधणी, मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत अशा अनेक योजनांच्या साह्याने मदतीचा भरघोस हात पुढे केल्यानंतर ‘नाम फाउंडेशन’ आता देशाच्या संरक्षणार्थ रात्रदिवस झटणाऱ्या जवानांसाठी पुढे सरसावले आहे.
येत्या १० एप्रिलला गणेश कला क्रीडा मंच येथे होणाऱ्या कार्यक्रमात ‘जय जवान, जय किसान’ या घोषणे अंतर्गत ‘नाम फाउंडेशनच्या’ वतीने महाराष्ट्रातील २० शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख ५० हजाराची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. ही मदत स्वतः नाना पाटेकर यांच्यातर्फे करण्यात येणार आहे.
या उपक्रमाबद्दल मकरंद अनासपुरे म्हणाले की, हा उपक्रम फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित नसून, या नंतर विविध ठिकाणी कार्यक्रम घेऊन देशभरातील जवानांच्या कुटुंबियांना या मोहिमेद्वारे मदत करण्याचा नाम फाउंडेशनचा मानस आहे. तसेच या कार्यक्रमाद्वारे देशाच्या युवावर्गाला शेतकरी आणि जवानांच्या सद्यस्थितीचे गांभीर्य कळेल अशी आशा व्यक्त करून जास्तीत जास्त युवकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
सदर कार्यक्रम १० एप्रिल, २०१७ रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे संध्याकाळी साडेपाच वाजता सर्व नागरिकांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2017 11:44 am