बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या आगामी ‘नाम शबाना’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दोन मिनिट १२ सेकंदाच्या या व्हिडिओत  तापसी पन्नू व्यतिरीक्त बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार, अनुपम खेर, मनोज वाजपेयी आणि डॅनी डेंजोग्पा यांची देखील झलक पाहावयास मिळते. ट्रेलरच्या आधी या चित्रपटाचे दोन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. हा चित्रपट २०१५ साली आलेल्या ‘बेबी’ चित्रपटाचा प्रिक्वल आहे. त्यावेळी चित्रपटात शबानाची व्यक्तिरेखा साकारणा-या तापसी पन्नूच्या भूमिकेस प्रेक्षकांची बरीच पसंती मिळाली होती. ‘बेबी’ प्रदर्शित झाल्याच्या दोन वर्षांनंतर येणा-या या चित्रपटात शिवम नायरने शबानाची पूर्व कहानी सांगितली आहे.

दिग्दर्शक नीरज पांड्ये हा सत्य घटनांवर आधारित कथानक लिहण्यासाठी ओळखला जातो. नीरजने आतापर्यंत ‘वेनस्डे’, ‘स्पेशल २६’ आणि काही महिन्यांपूर्वीच आलेल्या ब्लॉकबस्टर ‘एमएस धोनी..’ यांसारखे चित्रपट बनवले आहेत. या पंक्तीत आता नीरजचा आगामी चित्रपट ‘नाम शबाना’ हा समाविष्ट झाला आहे. नीरजच्या युनिटमध्ये असलेल्या एका जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘नाम शबाना’ हा चित्रपट शबाना नामक अंडरवर्कर महिला एजंटच्या आयुष्यावर आधारित आहे.

‘नाम शबाना’ चित्रपटात शबानाची मुख्य व्यक्तिरेखा तापसी पन्नूने साकारली आहे. ‘पिंक’सारखा चित्रपट दिल्यानंतर तापसी तिच्या चित्रपटाची निवड अगदी काळजीपूर्वक करत असल्याचे दिसते. त्यामुळे या चित्रपटातून एक दमदार तापसी आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाही. ट्रेलरमध्ये तापसीने केलेले स्टंट हे लक्षवेधक आहेत. ट्रेलरमधून तिने चित्रपटासाठी किती मेहनत घेतली असेल याचा अंदाज लावता येतो. ‘नाम शबाना’ चित्रपट येत्या ३१ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच तापसीने फेअरनेस क्रीम ब्रॅण्डचे नाव ऐकताच एक कार्यक्रम नाकारला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरमध्ये होणा-या कार्यक्रमाला तापसी पन्नू उपस्थिती लावणार होती. या कार्यक्रमाचा उद्देश महिला सक्षमीकरण असा होता. तापसी तिथे महिलांशी जोडल्या गेलेल्या मुद्दयांवर चर्चा करणार होती. पण, जेव्हा तिला कार्यक्रमाच्या आयोजकांचे नाव कळले तेव्हा तिने कार्यक्रमात जाण्यास नकार दिला. कारण, ज्यावर ती स्वतः विश्वास ठेवत नाही अशा कोणत्याही गोष्टीचे समर्थन तिला करायचे नाही. अगदी शेवटच्या क्षणी नाव परत घेण्याबद्दल तिने माफीदेखील मागितली. याविषयी बोलताना तापसी म्हणाली की, मी अगदी शेवटच्या मिनिटाला हा निर्णय घेतला ते मला कळतंय. जेव्हा मला कार्यक्रमाचे नाव कळले तेव्हा मी हा निर्णय घेतला. मी गोरी असल्यामुळे मला काही चित्रपटांना मुकावे लागले आहे. गोरेपणाला मी कोणत्याही पद्धतीने प्रमोट करणार नाही.