नाझ म्हटल्यावर आजच्या पिढीला काही अर्थबोध होईल असे वाटत नाही. पण आज आपण जे एखाद्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी पंचवीस-तीस कोटीची कमाई केली याच्या ‘ब्रेकिंग न्यूज’ होतात याची पाळेमुळे याच नाझमध्ये होती असे म्हटल्यावर हे चित्रपटाच्या आर्थिक उलाढालीसंदर्भात काही आहे अशी नक्कीच उत्सुकता निर्माण झाली असेल. नाझला नुकतेच टाळे लागले आणि चित्रपट व्यवसायातील किमान दोन-तीन पिढ्या हळहळल्या. असे भावुक होण्यासारखे यात काय आहे, ‘बागी २’ने पन्नास तर ‘रेड’ने शंभर कोटीचा घसघशीत टप्पा गाठलाय त्याचा आनंद व्यक्त करा, प्रॅक्टीकल व्हा असा सल्ला सहजच कोणी देईल.

दक्षिण मुंबईतील डॉ. भडकमकर मार्गावर हे नाझ आहे. त्याचे मुख्य चित्रपटगृह काही वर्षांपूर्वीच बंद पडले (चित्रपट सुरु असतानाच बाळ रडले तर त्याला घेऊन त्याची आई चित्रपट पाहू शकेल अशी काचेची क्राय रुम तेथे होती.) तर यालाच जोडून असलेल्या इमारतीत चित्रपट वितरकांची कार्यालये होती. देशभरात प्रदर्शित होणार्‍या हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनाचे व्यवहार येथे अनेक वर्षे होत. ‘नाझच्या परिसरात’ अथवा ‘नाझच्या वर्तुळात’ अशी बोलण्याची पद्धत होती. नेमके काय व्हायचे येथे? जवळपास सर्वच हिंदी चित्रपटाना प्रदर्शित करण्यासाठी ‘नाझच्या परिसरात’ येणे गरजेचे होते. येथे लहान-मोठे असंख्य वितरक अशा चित्रपटाचे हक्क विकत घेत. त्या काळात ते हक्क दहा वर्षांसाठी असत. काही चित्रपट कोणताच वितरक पसंत करीत नसे. असे चित्रपट डब्यात जात. वितरकाकडून प्रदर्शक (चित्रपटगृह चालक, मालक) तो चित्रपट काही हमी रक्कम देऊन आपल्या चित्रपटगृहात लावे. ही सर्वसाधारण पध्दत होय. यात चित्रपटाच्या लहान-मोठ्या स्वरूपानुसार गणिते बदलत. तात्पर्य चित्रपटसृष्टीचा सगळाच आर्थिक डोलारा या नाझमध्ये होता. मॉडर्न मुव्हीजचे गुलशन रॉय यामधील ‘किंग’ होते. ‘जॉनी मेरा नाम’, ‘दाग’, ‘दीवार’, ‘त्रिशूल’, ‘त्रिदेव’ या चित्रपटांचे ते वितरक. वृत्तपत्रातील जाहिरातीत या वितरकांचे नाव आजही तळाला येते. त्यांचे नाव श्रेयनामावलीत शक्यतो येत नाही. ‘डिलक्स पिक्चर’, ‘जनता रिलीज’, ‘बसंत पिक्चर्स’, ‘शृंगार फिल्म’ अशा अनेक वितरकांचा येथे जणू अड्डा. दादा कोंडकेंच्या ‘सदिच्छा चित्र’चेही नाझमध्ये कार्यालय. विजय कोंडकेनी दादांचे चित्रपट येथूनच खेड्यापाड्यात नेले. ‘नवरी मिळे नवऱ्याला’ इत्यादी चित्रपटाचे निर्माते सतिश कुलकर्णी यांचे ‘तुलसी प्रॉडक्शन्स’चे ऑफिसही येथेच. तर नीतिन दातार यांच्या उदय चित्रचे कार्यालय अजूनही कार्यरत. हिंदीचा दबदबा असणार्‍या नाझमधील ही मराठी नावे. अजय देवगणने ‘बसंत पिक्चर्स’चे ऑफिस विकत घेऊन तेथे ‘देवगण एण्टरप्रायझेस’चे कार्यालय थाटले तेव्हा तो नाझमध्ये आला आणि रांगेत उभा राहून लिफ्टमधे शिरला. येथे ‘स्टार’पण चालत नव्हते. अमोल पालेकरपासून सुजीतकुमारपर्यंत निर्माते झालेले कलाकार वितरकांच्या भेटीस नाझमध्ये आलेत. बघता बघता नाझ वितरकांनी तुडुंब भरले म्हणून मग समोर आणि आजूबाजूला नवीन कार्यालये आली. हातगाडीवर नवीन चित्रपटाची प्रिंट टाकूनही वितरकाशी बोली लावता येईल असेही गंमतीत म्हटले जाई. नाझला कधीही फेरफटका मारल्यास नवीन चित्रपटांची पोस्टर्स अथवा माहिती हमखास मिळे. म्हणूनच तर तेथील भटकंती रंजक होई. त्यात शुक्रवार सर्वात महत्त्वाचा. त्या काळात मेन थिएटर फंडा महत्त्वाचा होता. म्हणजेच दक्षिण मुंबईतील चित्रपटगृह. तेथील ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’चा पब्लिक रिपोर्ट बॅरोमीटर मानला जाई. तो तीनचा खेळ सहा वाजता संपताच नाझमध्ये ऐकायला मिळे….. तो नवीन चित्रपट हिट की फ्लाॅप याचे हुकमी उत्तर तेथे पहिल्याच दिवशी मिळे. त्या काळात आजच्यासारखे कोणी किती कोटी कमावले अशा आकडेवारीने चित्रपटाचे मूल्य ठरवले जात नसे व तोच प्रघात योग्य होता. पब्लिकला ‘घायल’ आवडला, हिट झाला. पब्लिक ‘मृत्युदाता’वर नाराज झाला म्हणून फ्लॉप झाला इतके व असे साधे गणित. त्या काळात चित्रपट व्यवसायात भावनिकपणा कायम होता.

हे सगळेच गेले कुठे? हे फ्लॅशबॅकमध्ये जमा का झाले? तो नाझभर चित्रपटाची चर्चा रंगणारा सूर गेला कुठे?

चित्रपट व्यवसायात नवीन पिढी आली. कार्पोरेट संस्कृती रुजली. ‘इरॉस इंटरनॅशनल’ वगैरे ‘बिग’ कंपन्या वितरणात आल्या. त्यांची प्रशस्त ऑफिसेस वर्सोवा-ओशिवरात आली. त्यांचे हायफाय कल्चर वेगाने रुजले. नाझमधील काही ऑफिसेस म्हणजे एकाच ठिकाणी चार टेबले आणि चार छोटे वितरक असा प्रकार पाहायला मिळे. चित्रपट व्यवसाय बदलला आणि नाझला वेगाने गळती लागली. त्याचे थिएटर बंद झाल्यावर तर वातावरण निराशाजनक झाले. हळूहळू तेथे उदासीनता जाणवू लागली. अनामिक शांततेचा अनुभव येऊ लागला. अलिकडे कधीही जावे तर फक्त जुन्या आठवणी येत. नवीन अनुभव येणे जणू थांबले. मध्यम वा छोटे चित्रपट येथील वातावरणात जान आणू शकत नव्हते. या व्यवसायाची गती थंबावल्याचा फिल येई. आता तर ते सगळेच इतिहासजमा होत चाललयं. मोठ्याच प्रमाणात चित्रपट निर्मिती होतेय. पण त्याच्या वितरणाचे केंद्र बदललयं. ते नेमके कोठे आहे हे सांगता येणार नाही, ते विविध ठिकाणी पसरलयं. ‘नाझ’ मात्र एकच होते. म्हणूनच ते वैशिष्ट्यपूर्ण होते.
दिलीप ठाकूर