करोना व्हायरस अधिकाधिक पसरू नये यासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. या लॉकडाउनमुळे अभिनेत्री नफिसा अली सोढी गोव्यात अन्नधान्य व औषधांशिवाय अडकल्या आहेत. दररोजचं जेवण आणि तिला लागणारी औषधंसुद्धा मिळत नसल्याची व्यथा नफिसा यांनी सांगितली.

६३ वर्षांच्या नफिसा यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, “गेल्या सहा दिवसांपासून इकडे किराणा मालाची दुकानं बंद आहेत. मी कॅन्सरमधून बचावली आहे. त्यामुळे योग्य जेवण आणि औषधांची मला गरज असते. गेल्या काही दिवसांपासून मी सुके पदार्थच खाऊन जगतेय. इथे भाज्या नाहीत, फळं नाहीत. गोव्यातील मोर्जिम इथं मी राहतेय आणि अत्यंत बिकट परिस्थितीला इथली लोकं सामोरी जात आहेत. पंजिममध्ये परिस्थिती जरा ठीक आहे.”

मार्च महिन्याच्या सुरुवातीला त्या मुलीसोबत दहा दिवस फिरण्यासाठी गोव्यात आल्या होत्या. मात्र लॉकडाउनमुळे त्यांना तिथेच थांबावं लागलं. त्यांच्याकडे असलेली सर्व औषधं आता संपली आहेत. “कुरिअर सर्व्हिस पण बंद असल्याने मी औषधं मागवू पण शकत नाही. माझ्याकडे कुठलाच पर्याय उपलब्ध नाही. मोर्जिममधल्या काही मेडिकल शॉपमध्ये मला लागणारी औषधं मिळत नाहीत आणि ती औषधं घ्यायला मी इथून पंजिमलासुद्धा जाऊ शकत नाही”, असं त्यांनी सांगितलं.

भाजी दिया नायडू हिला करोनाची लागण झाल्याचं नफिसा यांनी यावेळी सांगितलं. त्यांची भाची बेंगळुरूमध्ये राहते. “माझी भाची स्वित्झर्लंडमधून आली आणि वैद्यकीय तपासणीत तिला करोनाची लागण झाल्याचं निदान झालं. लोकं बरी होत आहेत पण त्यांना वेळीच औषधोपचार मिळाले पाहिजे”, असं त्या म्हणाल्या.