चाहते आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी कधी काय करतीय याचा नेम नसतो. कधी ते त्यांच्या इवेंटला जाऊन बसतात तर कधी कलाकारांच्या घराबाहेर जाऊन वाट पाहत असतात. असेच काहीसे दाक्षिणत्य सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यच्या बाबतीत घडले. त्याच्या एका चाहत्याने त्याला भेटण्यासाठी चक्क नदीमध्ये उडी मारली आहे. सध्या या चाहत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

नागा चैतन्याच्या चाहत्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो चाहता नागा चैतन्यची एक झलक पाहण्यासाठी नदीमध्ये उडी मारतो. त्यानंतर त्या चाहत्याने नागा चैतन्यसोबत फोटो काढले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी त्या चाहत्याची प्रशंसा केली आहे तर काहींनी हे कृत्य चुकीचं असल्याचे म्हटले आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये कलाकरांची फॅन फॉलोइंग जास्त असल्याचे म्हटले जाते. आजवर आपण पाहिले आहे की अनेक चाहते अभिनेते रजनीकांत यांची पूजा करतात. तसेच कमल हासन, चिरंजीवी, नागार्जुन, महेश बाबू, यश, किच्चा सुदीप, अल्लू अर्जुन अशा अनेक कलाकारांचा चाहता वर्ग मोठा आहे. चाहत्यांनी या कलाकारांची मंदिरे देखील उभारली आहेत.

नागा चैतन्य हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. तो सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘थँक्यू’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम कुमारने केले आहे. या व्यतिरिक्त नागा चैतन्य ‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटात देखील दिसणार. पुढच्या महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.