‘लाइफ ओके’ वाहिनीवरील ‘नागार्जुन’ नवी मालिका

व्हीएफएक्स तंत्राच्या मदतीने पौराणिक कथा आणि सुपर हिरो कथा मालिकांमधून रंगवणे सहजसोपे झाले आहे. मात्र याच तंत्राच्या मदतीने पौराणिक काळातील व्यक्तिरेखा आणि त्याच काळाचा धागा घेऊन पुढे आलेला आजच्या पिढीचा सुपर हिरो या दोघांना अनोख्या पद्धतीने एकत्र आणण्याचा प्रयत्न ‘लाइफ ओके’ वाहिनीवरील ‘नागार्जुन’ या नव्या मालिकेत करण्यात आला आहे. या मालिकेत नाग आणि आजच्या काळातील अर्जुन यांची कथा असल्याने पाताळनगरी आणि पृथ्वीवरचा त्यांचा वावर या दोन्ही गोष्टी ‘माव्‍‌र्हल’ स्टुडिओचे काम करणाऱ्या व्हीएफएक्स तंत्रज्ञाकडून करण्यात आल्या आहेत.

‘नागार्जुन’च्या संकल्पनेतच पौराणिक कथेचा संदर्भ मोठा आहे. त्यामुळे व्हीएफएक्स तंत्राचा वापर हा या मालिकेसाठी खूप मोठय़ा प्रमाणावर करावा लागणार होता. हे लक्षात घेऊन गेले वर्षभर आम्ही फक्त व्हीएफएक्सच्या दृष्टीने तयारी करत होते.

मात्र व्हीएफएक्स आणि अ‍ॅनिमेशन तंत्राने गोष्ट पडद्यावर रंगवणे हा तुलनेने सोपा भाग आहे. नागलोक आणि आजची दुनिया जोडताना ही गोष्ट कशी दिसेल, त्यातील अ‍ॅनिमेटेड व्यक्तिरेखा, त्यांचा लुक हा संपूर्ण अवकाश कसा असेल, याचे कल्पनाचित्र उभे करणे हे अवघड होते आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केलेला आर्टिस्ट आम्हाला हवा होता, अशी माहिती मालिकेचे निर्माते यश पटनाईक यांनी दिली. ‘माव्‍‌र्हल’ स्टुडिओच्या ‘हल्क’ या चित्रपट मालिकेसह आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळे व्हीएफएक्स प्रोजेक्ट्सवर काम के लेल्या मुकेश सिंग यांना या मालिकेच्या व्हीएफएक्सची जबाबदारी देण्यात आली आहे. मुकेश यांनी आंतरराष्ट्रीय गायक मॅडोना हिचा पती गाय रिची याच्याबरोबर काम केले असून ‘गेमकीपर’ हा व्हिडीओगेमही त्यांनी तयार केला आहे. मुकेश यांच्यावर या शोचे व्हिज्युअलाईजर म्हणून जबाबदारी देण्यात आली असून ‘वेर्टेक्स स्टुडिओ’ व्हीएफएक्सचे काम पाहतो आहे. ‘वेर्टेक्स’च्या ऐंशीजणांची टीम या मालिकेसाठी काम करते आहे, असे यश पटनाईक यांनी सांगितले.

‘नागार्जुन’च्या मालिकेची कथा थेट महाभारत काळापासून सुरू होते. इंद्रप्रस्थ वसवण्यासाठी अर्जुनाने खांडववन जाळले. त्यावेळी तिथे वास्तव्याला असलेला नागराजा तक्षक आणि त्याचे कुटुंबीय यात बळी पडले. तेव्हापासून नागलोक आणि पृथ्वीलोक यांच्यात युद्ध सुरू आहे. नागांची ही सूडकथा आजच्या काळातील अर्जुन नावाच्या सर्वसामान्य मुलापर्यंत पोहोचते, अशी या मालिकेची सर्वसाधारण कथाकल्पना असून या एकाच मालिकेत नागांचा राजा आणि अर्जुनासारखा सुपर हिरो अशा दोन संकल्पना एकत्र आल्या आहेत. यामागे ग्रामीण भागासह शहरी भागात असलेला पौराणिक मालिकांचा एक मोठा प्रेक्षकवर्ग आणि सुपर हिरोंमध्ये रस असणारा शहरी तरुण प्रेक्षकवर्ग एकत्र आणण्याचा आपला उद्देश असल्याचे यश पटनाईक यांनी स्पष्ट केले.