News Flash

‘नाळ’चा बॉक्स ऑफिसवर दणका; पहिल्या आठवड्यातच चौदा कोटींची विक्रमी कमाई

'नाळ'ने तब्बल १४ कोटींची कमाई करून 'सैराट' पाठोपाठ पहिल्याच आठवडयात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरून एक नवा विक्रम रचला आहे.

naal
'नाळ'

‘झी स्टुडिओज’ व नागराज मंजुळे यांची प्रस्तुती असलेल्या, सुधाकर रेड्डी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘नाळ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि रसिकांनी चित्रपटगृहांमध्ये एकच गर्दी करत यावर आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली. पहिल्या सात दिवसांतच या चित्रपटाने सर्वत्र हाऊसफुल्लचे बोर्ड झळकावत तब्बल चौदा कोटींची विक्रमी कमाई केली आहे. मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवणा-या ‘नाळ’ चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही आपली तुफानी घोडदौड कायम ठेवली असून चित्रपटगृहातून बाहेर पडणारा प्रत्येक प्रेक्षक भारावून गेल्याच्या प्रतिक्रिया देत आहे. सोशल नेटवर्क साइट्सवरूनही चित्रपटाबद्दल, लहानग्या चैतूच्या म्हणजेच श्रीनिवास पोकळेच्या अभिनयाबद्दल प्रेक्षक भरभरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

‘नाळ’ने तब्बल १४ कोटींची कमाई करून ‘सैराट’ पाठोपाठ पहिल्याच आठवडयात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरून एक नवा विक्रम रचला आहे. मुंबई पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि इतर शहरांमध्येही या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळतोय. याशिवाय महाराष्ट्रासह हा चित्रपट इतर राज्यातही प्रदर्शित झाला असून, तामिळ आणि मल्याळम भाषिक चित्रपटांची मक्तेदारी असणाऱ्या चेन्नई आणि बेंगळुरू इथं प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी खेचण्यात ‘नाळ’ यशस्वी झाला आहे.

‘नाळ’च्या या यशाबद्दल दिग्दर्शक सुधाकर रेड्डी म्हणाले, ‘नाळ चित्रपट हे माझं स्वप्न होतं. हा चित्रपट प्रत्येकाला भिडावा हाच आमचा उद्देश होता. आज ‘नाळ’ला मिळालेलं यश पाहता आम्ही आमच्या उद्देशात यशस्वी झालोय असं वाटतंय. याचा मला आणि पूर्ण टीमला खूप आनंद होतोय.’

झी स्टुडिओजचे सीईओ शारिक पटेल म्हणाले, एका सकारात्मक विचारातून तयार झालेली कथा आणि तो विचार प्रभावीपणे दिग्दर्शनातून मांडण्यात नाळ यशस्वी झाला आहे याचा आनंद आहे आणि त्याबद्दल सर्व रसिक प्रेक्षकांचे मी आधार मानतो.

‘नाळ’चे निर्माते आणि अभिनेता नागराज मंजुळे म्हणाले, ‘सर्वसामान्य माणसांचं जगणं रूपेरी पडद्यावर मांडणाऱ्या, लोकभाषेत अभिव्यक्त होणाऱ्या एका साध्या तरीही तरल कथेला प्रेक्षकांनी दिलेला हा उदंड प्रतिसाद म्हणजे रसिकांच्या अभिरुची संपन्नतेची पावती आहे. मराठीमध्ये चांगल्या सिनेमाच्या पाठिशी प्रेक्षक नेहमी उभा राहतो हे या यशामधून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. यासाठी मी महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचे आभार तर मानेनच पण त्यांच्या सुजाण अभिरुचीचेही अभिनंदन करीन’
दुसऱ्या आठवड्यातसुद्धा हा चित्रपट सुमारे ४५० चित्रपटगृहे आणि ११,००० खेळांमधून (शो) प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 11:58 am

Web Title: nagraj manjule naal marathi movie box office collection
Next Stories
1 ही तर अनुष्का-कंगनाची सरमिसळ ! सब्यासाची पुन्हा ट्रोल
2 कॅन्सरग्रस्त ताहिरा कश्यपचं पुन्हा कमबॅक, ट्विट करुन दिली माहिती
3 होणाऱ्या नवऱ्यासाठी प्रियांकाची ‘Thanksgiving’ पार्टी
Just Now!
X