अार्ची आणि परश्याची प्रेमकथा सध्या राज्याच्या कानाकोपऱ्यांमधील चित्रपटगृहांतून धुमाकूळ घालते आहे. नागराज मंजूळे दिग्दर्शित चित्रपटाला राज्यभरातील प्रेक्षकांकडूनही ‘सैराट’ प्रतिसाद मिळत असल्याने सगळीकडे हाऊसफुल्लची पाटी झळकते आहे. पहिल्याच आठवडय़ात या चित्रपटाने तिकीटबारीवरील कमाईचा २५ कोटींचा आकडा पार केला होता. आता या चित्रपटाचा दुसरा आठवडा चालू असून चित्रपटाने आणखी काही कोटींची कमाई केली आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत गेल्या वीकएंडमध्ये चित्रपटाने किती कमाई केली, याची आकडेवारी अधिकृतपणे स्पष्ट होईल. पण ‘सैराट’ला महाराष्ट्रात सर्वत्र बॉक्स ऑफिसवर मिळणारा प्रतिसाद पाहता हा चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडणार यात तिळमात्र शंका नाही.
नाना पाटेकर यांच्या अस्सल अभिनयाने रंगलेल्या ‘नटसम्राट’ या चित्रपटाने आत्तापर्यंत ३५.१० कोटींचा गल्ला जमवून मराठी चित्रपटसृष्टीत नवा विक्रम केला होता. आज संध्याकाळी सैराटची अधिकृत आकडेवारी जाहीर होईल. त्यानंतर सैराट हा चित्रपट नटसम्राटला मागे टाकून मराठी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाईचा नवा विक्रम प्रस्थापित करेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
पहिल्या आठवड्यात ‘बागी’सोबत सैराट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी मल्टिप्लेक्समध्ये बागी आणि सैराटला प्रत्येकी एक एक मोठा स्क्रिन देण्यात आला होते. पण सैराटला मिळणारा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा कैकपटीने अधिक चांगला असल्यामुळे दुसऱ्या आठवड्यात मल्टिप्लेक्समधील मोठे स्क्रिन्स सैराटसाठीच राखून ठेवण्यात आले. पुण्यामध्ये काही मल्टिप्लेक्समध्ये सकाळी साडेआठ वाजल्यापासून सैराटचे शो दाखवले जात असून ते सुद्धा हाऊसफुल्ल होत असल्याचे चित्र आहे.
या चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारी रिंकू राजगुरू हिच्या गावी अकलूजमध्ये श्रीराम या चित्रपटगृहात सैराटचे शो लावण्यात आले आहेत. तिथे सकाळी सहा वाजल्यापासून तिकीट काढण्यासाठी प्रेक्षकांची रांग लागते. अधिकाधिक महिलांनाही हा चित्रपट बघता यावा, यासाठी या थिएटरमधील दुपारी १२ आणि ३ चा शो हा केवळ महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. याही शोंना महिलांचा तुफान प्रतिसाद मिळत असून, चार ते पाच दिवस अगोदर बुकिंग करावे लागत असल्याचे चित्र आहे.
एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात २९ तारखेला ‘सैराट’ राज्यात प्रदर्शित झाला. ‘सैराट’ पहिल्या आठवडय़ात ४०० चित्रपटगृहांमधून प्रदर्शित झाला. आठवडय़ाला ९ हजार शो दाखवण्यात येत होते. आता ४५६ चित्रपटगृहांमधून आठवडय़ाला १३ हजार शो दाखवले जात असून, तरीही हाऊसफुल्लची पाटी कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagraj manjules sairat going to break all marathi movies record
First published on: 10-05-2016 at 11:15 IST