छोट्या पडद्यावरच्या मालिकांबाबत कायमच पुढच्या भागात काय होणार याबाबत उत्सुकता असते. मग त्या मालिकेलती कोणते पात्र कसे वागणार, एखाद्या प्रसंगात काहीतरी घडणार का अशा नोटवर मालिकेचा आधीचा भाग संपतो. ज्यामुळे पुढील भाग बघण्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढते. स्टार प्रवाह वाहिनीवरील नकळत सारे घडलेमध्ये असाच एक खास ट्विस्ट येणार आहे. रांगडे पाटील कुटुंबावर संकटांची मालिका अखंड सुरुच असून एकीकडे मेधाची कटकारस्थानं संपतात न संपतात तोच आता सर्वांच्या लाडक्या परीचा जीव धोक्यात आलाय.

निरागस हास्य आणि बडबड्या स्वभावाने प्रत्येकालाच लळा लावणारी परी मृत्यूशी झुंज देतेय. परीच्या या अवस्थेला कारणीभूत आहे खुद्द नेहा. परीला पोटच्या मुलीप्रमाणे वाढवणाऱ्या, तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या नेहाकडून एक अक्षम्य चूक झालीय. परीच्या आजारपणात नेहाने तिच्यावर चुकीचे औषधोपचार केलेत. नेहाकडून झालेल्या या चुकीची शिक्षा निष्पाप परीला भोगावी लागणार आहे. डॉक्टर परीला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत, पण डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळेल का? परीचा जीव वाचेल का? या कठीण प्रसंगाचा सामना नेहा कशी करणार? या साऱ्या प्रश्नांचा उलगडा ‘नकळत सारे घडले’च्या महाएपिसोडमध्ये होणार आहे. हा महाएपिसोड रविवार ७ ऑक्टोबरला दुपारी २ आणि रात्री ८ वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.