स्टार प्रवाहवरच्या ‘नकुशी’ मालिकेतल्या बग्गीवाला चाळीत एक फेरफटका मारला, की अनेक गमतीजमती अनुभवाला येतात. तिथली धमाल प्रत्यक्ष अनुभवून लिहिलेली आँखो देखी-

गल्लीच्या टपरीवर पोरांनी गल्ला केला होता. बाजूच्याच सार्वजनिक, मोफत वाचनालयात चाळीतली साठी उलटलेली एक-दोन मंडळी पेपर वाचत बसली होती. पहिल्या मजल्यावर छबूकाका आपल्या बाकडय़ावर पहुडले होते आणि नजरा चुकवून मंदार-अर्चना आपल्या प्रेमाचा संदेश एकमेकांना पाठवत होते. हे सगळं लालबागच्या बग्गीवाला चाळीतलं दृश्य. सध्या ही चाळ मीरा रोड इथं वास्तव्याला आहे. आता लालबागची अख्खी चाळ मीरा रोडला कशी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? अहो, स्टार प्रवाहवरच्या ‘नकुशी’ मालिकेतल्या बग्गीवाला चाळीविषयी बोलतेय मी. या चाळीत एक फेरफटका मारला आणि आपण खरंच लालबाग परळमधल्या चाळीत वावरतोय की काय असं वाटलं.

salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Mumtaz slams Zeenat Aman for suggesting live-in
“यामुळे फॉलोअर्स वाढणार नाही”, झीनत अमान यांच्या ‘त्या’ सल्ल्यावर भडकल्या मुमताज; म्हणाल्या, “Cool आंटी…”
18 month old baby head stuck in vessel viral video
पातेल्यात अडकले चिमुकल्या बाळाचे डोके!अग्निशमन कर्मचाऱ्यांनी कसे वाचवले त्याचे प्राण, पाहा हा Video…
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा

स्टुडिओच्या गेटमधून आत शिरलं की, एक छोटी गल्ली लागते आणि आठ-दहा पावलांत गल्ली संपतेही. गल्लीच्या टोकाला बग्गीवाला जनरल स्टोअर लागतं, जिथं चाळवाल्यांना लागणारी वाट्टेल ती वस्तू मिळते. सेटमधलं हे खोटं स्टोअर मात्र खऱ्या चिप्सच्या पॅकेट्सनी आणि लाडू-चॉकलेटच्या डब्यांनी गच्च भरलेलं आढळतं. तिथंच बाजूला मोफत वाचनालय होतं. चाळीला एकच मजला, पण त्यात बिऱ्हाडं खच्चून भरलेली. नकुशीचे आर्ट डिरेक्टर अमित मिश्रा यांनी चाळीचा हा सेट डिझाईन केला आहे. चाळीच्या या सेटमध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी जान आणलीये. एकूण सहा हजार स्क्वेअर फुटांवर ही चाळ उभी केली गेलीये. हा सेट तयार होण्यापूर्वी मुंबईतल्या चाळींचा अभ्यास आणि तयारीसह सेट उभा करण्यासाठी तीन महिने लागले. दररोज ३५ ते ४० कामगार हा सेट बांधत होते. त्यानंतर ३५ दिवसांनी सेटचं काम पूर्ण झालं. अमित मिश्रा यांचं बालपण वरळीतल्या चाळीत गेल्यामुळे चाळ कशी असते, चाळीतल्या व्यक्तिरेखा खऱ्या वाटायला हव्यात या मतावर सगळेच ठाम होते. त्यामुळे सेटवजा चाळीत अनेक गोष्टी तयार करून नंतर त्या तोडल्या गेल्या आहेत. चाळीत म्हणजेच या सेटवर एक नजर टाकली की, चाळीशी निगडित इतके बारकावे आपल्याला दिसतात की, काही क्षण आपणच ही खरी चाळ की सेट या विचारात गोंधळून जातो. खोल्यांसमोरची बाकडी, नावाच्या पाटय़ा, गॅलरीतल्या कपडे वाळत घालायच्या दोऱ्या, भंगारातली सायकल, पाण्याचा पिंप भरायचा हिरवा पाइप, मोडकळीला आलेली खुर्ची, दारावर चिकटवलेले स्टिकर्स, कोपऱ्यातली स्वच्छतागृहं, त्यांच्या भिंतींवर लिहिलेले मेसेजेस, त्यांचे निळे दरवाजे अशा सगळ्या बारीकसारीक पण महत्त्वपूर्ण वस्तूंनी ती चाळ जिवंत केली आहे. चाळीतला कोपऱ्यातला इस्त्रीवाला, टय़ूशनचा बोर्ड, टेलरिंग मशीन चाळीची शान वाढवतात.

‘नकुशी’ची क्रिएटिव्ह हेड सानिका अभ्यंकरशी बोलल्यानंतर या सेटवर दिवसभर ८० ते १०० माणसांचा राबता असतो हे कळलं. यात लाइटमन, स्पॉटबॉय, कॅमेरा टीम आणि कलाकार या सगळ्यांचा समावेश असतो. मात्र जेव्हा अख्ख्या चाळीचं शूटिंग लागतं तेव्हा चाळीतलीच वीस ते पंचवीस माणसं एकदम लागतात. मग मेकअप आर्टिस्ट वाढतात; परंतु शंभर माणसांचा वावर या सेटवर दररोज असतो, असं आपण म्हणू शकतो. सेटवरची अख्खी टीम शिफ्ट्समध्ये काम करते. शिफ्ट्स सहसा सकाळी नऊ ते रात्री नऊ अशा असतात. सेटवर याला शहाण्या मुलांसारखं काम करणं म्हणतात. कधीकधी सीन्सप्रमाणे वेळा बदलाव्या लागतात. म्हणजेच कधी नाइट सीन्स जास्त असले, की त्यामुळे दुपारी दोन ते रात्री दोन अशी शिफ्ट लागते. ते सगळ्यांनाच सोयीचं पडतं. त्याचप्रमाणे दिवसाचे सीन्स जास्त असतात तेव्हा सकाळी सातची शिफ्ट असते; परंतु सर्वसाधारण शिफ्ट ही नऊचीच असते.

डेली सोप म्हटल्यावर रोजच ताण असतो; परंतु किमान पाच ते सहा सीन्स होणं किंवा बावीस ते चोवीस मिनिटांचं फुटेज निघणं हे लक्ष्य असतं. त्याचप्रमाणेच टीम काम करते.

अफताफ या सेटचा केअरटेकर आहे. तो सेटवरच राहतो. त्यामुळे सेटची शिफ्टच्या आधी साफसफाई करून तो सेट तयार ठेवतो. नऊ च्या शूटिंगच्या शिफ्टला अफताफची शिफ्ट सकाळी सात किंवा त्याआधीच चालू होते. ‘नकुशी’च्या टीममधली मंडळी म्हणजे टेक्निशियन्स वगैरे साडेआठपर्यंत यायला लागतात. तसंच सकाळी नऊ ची शिफ्ट रात्री नऊ वाजता संपते; परंतु पॅकअप होईपर्यंत सव्वादहा वाजतात.

नकुशी’च्या सेटवरच्या जास्तीत जास्त लोकांना चाळीत राहण्याचा अनुभव आहे. त्यामुळे सेट डिझाईन करताना चाळीतल्या बारीकसारीक गोष्टी लक्षात घेऊन सेट बनवला आहे. चाळीतले लोक कसे राहतात, त्यांच्या सवयी, घराचा परिसर या सगळ्याचा खूप अभ्यास त्यांनी केला आहे.

इतक्या खोल्या, इतकी माणसं, दिवसभर चालणारं शूटिंग आणि यासाठी लागणारी जागा हे नेमकं काय प्रकरण आहे, असा प्रश्न प्रेक्षक म्हणून आपल्याला पडतोच; परंतु यातल्या दररोजच्या अध्र्या तासात आपल्या नजरेला दिसतात त्या सगळ्या गोष्टी खऱ्या असतातच असं नाही. प्रेक्षकांना अनेकदा चीट केलं जातं. बग्गीवाला चाळीच्या सेटवर केलं जाणारं ‘चीट’ गमतीशीर आहे.

बग्गीवाला चाळीतलं पहिल्या मजल्यावरचं रणजितचं आणि नकुशीचं म्हणजे उपेंद्रचं आणि प्रसिद्धीचं घर हे सेटमध्ये खरं घर उभारलं आहे ज्यात मोरी, किचन, गॅलरी आहे.

आजूबाजूची सगळी घरं ही घरं नसून फक्त भिंती आहेत. सेटवर त्या घरांची फक्त दारं आहेत आणि त्या दारामागे एक भिंत तयार करून ठेवली आहे. त्या दारातून डावीकडे वा उजवीकडे जाऊन ते पात्र घरात गेलं, असं दाखवलं जातं.

दीपज्योती नाईक म्हणजेच तांडेल या व्यक्तिरेखेचे प्रसंग शूट केले जातात तेव्हा त्या दारातून आत गेल्या असं दाखवलं जातं; परंतु दारातून आत त्यांचं घर नसतंच. सेटवरच्या दुसऱ्या खोलीत त्यांच्या घराचं इंटीरिअर चीट केलं जातं. म्हणजेच त्या वरच्या मजल्याच्या घरात आत जातात, मात्र घरातलं शूट खाली असतं. जेवढी गरज लागते तेवढीच व्यवस्था सेटवर केली जाते.

समजा, एका सीनसाठी छबूकाकांचं घर दाखवायचं असतं. मग तांडेलच्या घरातच अँगल बदलून आणि प्रॉपर्टी बदलून छबूकाकांचं घर दाखवलं जातं, कारण असे फार कमी सीन आहेत, ज्यामध्ये छबूकाकांचं घर दाखवायचं आहे, कारण ते नेहमीच वरच्या मजल्यावर बाकडं आहे त्यावर बसलेले असतात. ते तिथेच झोपतात, त्यामुळे काही मोजक्या सीन्ससाठी अख्खं घर बनवण्याची आवश्यकता नसते.

तांडेलच्या रूममध्ये छबूकाकांचं घर शूट करण्यात कॅमेरामॅनला आव्हान असं की, एकाच प्रकारे कॅमेराचा अँगल लावावा लागतो, कारण अँगल बदलला असता तर तांडेलच्या घरातली प्रॉपर्टी दिसली असती. त्यामुळे मग वेगळा गॅस ठेवला, ड्रम ठेवला, त्यांचे कपडे ठेवले अशी गंमत करून त्यांची रूम त्या शूटपुरती दाखवली. या चीटमुळे क्रिएटिव्हिटीला वाव मिळतो.

मालिकेत मंदार-अर्चना हे जोडपं, जाडय़ा, पारकर फॅमिली यांची कुणाचीच घरं दाखवली जात नाहीत. मंदार-अर्चनाचे सगळे सीन्स गॅलरीत होतात. त्यामुळे घरात न जाता सगळे सीन गॅलरीत करणं आणि त्यातही एकसारखेपण नसणं हे आव्हानाचं काम आहे.

एका सीनच्या शूटिंगदरम्यान चायनीजची गाडी लावली होती. शूटिंगमध्ये दाखवलं गेलं की, काळाचौकीच्या परिसरात गाडी होती; परंतु ती खरी सेटवरच होती.

सेटवर मेकअप रूमच्या खाली सीरिअलमधली कॅॅरमरूम आहे आणि तीच रणजितच्या ऑफिसची पॅन्ट्रीसुद्धा आहे. सेट तसा बराच मोठा आहे; परंतु लोकेशन्स खूप असल्यामुळे तो लहान पडतो. त्या कॅरमरूममध्ये नकुशी आणि रणजितमधले बरेच सीन्स झाले आणि नंतर पॅन्ट्रीची गरज होती. कॅरमरूम दाखवायची असते तेव्हा पिवळ्या भिंती लावल्या जातात आणि रणजितचं ऑफिस दाखवायचं तेव्हा हलक्या निळ्या रंगाच्या भिंती मांडल्या- दाखवल्या जातात. जागा एकच परंतु दोन्हीमध्ये लायटिंग वेगळं असतं. कॅरममध्ये टिपिकल डीम पिवळे लाइट्स आणि पॅन्ट्रीमध्ये थोडे ब्राइट लाइट. तिथेच ऑफिसमधले बोर्ड्स लागतात, कॉफी मशीन लागतं की झाली ऑफिसची पॅन्ट्री.
मागच्या काही भागांत नकुशी आणि सौरभमधलं प्रेमगीत दाखवलं होतं. त्यात ते गावातला बाजार असतो असं दाखवायचं होतं. मग इथल्या गल्लीतच मार्केट लावलं गेलं होतं, कारण सगळं शूटिंग वाईला झालं होतं. मग तेवढय़ा एका सीनसाठी परत वाईला जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे जिलबीवाला, पाणीपुरीवाला, भाजीवाली, फुगेवाला हे सगळे खरे विक्रेते या गल्लीत बसवले गेले होते आणि दाखवला गेला होता खरा बाजार.

सौरभचं शिवाजी पार्कचं घरही या सेटचाच एक भाग आहे. मालिकेमध्ये ते शिवाजी पार्कला आहे असं बोलण्यातून सांगितलं जातं. मात्र ते सेटमध्येच आहे. सौरभची जी बेडरूम आहे तीच सौरभच्या आईचीही आहे. एकाच खोलीत इंटेरिअर म्हणजे भिंती आणि काही फर्निचर बदललं की दोन वेगळ्या खोल्या दाखवल्या जातात. यात सौरभच्या आईची रूम दाखवताना ब्राऊन फर्निचर वापरलं जातं आणि भिंतीवर सौरभ आणि त्याच्या आईचा एकत्र फोटो लावला जातो, तर सौरभच्या रूमसाठी ऑफव्हाइट फर्निचर आणि सौरभचा एकटय़ाचा फोटो भिंतीवर लागतो. सीन्सप्रमाणे एकाच खोलीच अदलाबदल करून चीट केलं जातं.

या सेटवर एक मॅजिक रूमही आहे. हो.. सेटवरची टीम या रूमला मॅजिक रूम म्हणते. ही रूम म्हणजे मालिकेमधली नकुशीची बहीण नैना आणि तिचा नवरा उस्मान यांची रूम. ही रूम म्हणजे मीरा रोडमधल्या झोपडपट्टीत राहणारं बिऱ्हाड. सेटवरच्या त्या रूमच्या भिंतीला फक्त पत्रे लावून ती खोली अति गरीब म्हणून दाखवली जाते. एखादं नवीन लोकेशन लागतं आणि सेटवर कुठलीच योग्य जागा नसते तेव्हा मॅजिक रूम म्हणजेच नैना-उस्मानचं घर ही ती जागा असते. मागच्या काही भागांत दाखवलेलं पोलीस स्टेशन हे याच मॅजिक रूममध्ये शूट केलं होतं.

मालिकेमधल्या कलाकारांनाही या सेटचा आता लळा लागला आहे. रणजित आणि नकुशीला चाळीतल्या त्यांच्या घरातली गॅलरी अतिशय प्रिय आहे. त्या दोघांच्या प्रेमाचे अनेक सीन्स तिथं शूट झालेत म्हणून ही जागा उपेंद्र आणि प्रसिद्धीची आवडती जागा आहे. रणजितचा मित्र कांडय़ाची आवडती जागा म्हणजे इस्त्रीवाला आणि तिथला जिना. फावल्या वेळेत सगळेच मित्र या जिन्यावर गप्पा मारत असतात. मंदार आणि अर्चनाची आवडती जागा म्हणजे चाळीची गॅलरी, कारण गॅलरीमध्येच त्यांचं प्रेम खुलतं. मालिकेमधली नकुशीची सासू, नकुशी आणि रणजितची बहीण यांची आवडती जागा मात्र सेटवरची मेकअप रूम आहे. या चाळीतली कुठली ना कुठली जागा यातल्या प्रत्येकाच्या मनात घर करून आहे.

सौजन्य – लोकप्रभा