News Flash

‘नकुशी’ने गाठला १०० भागांचा टप्पा

नकुशी प्रथा ही एक अंधश्रद्धा असून, आजही ती ग्रामीण महाराष्ट्रात कायम आहे.

महाराष्ट्रातील गावगाड्याचं चित्रण करणारी पहिली मालिका

महाराष्ट्रातील गावगाड्याचं पहिल्यांदाच चित्रण करणाऱ्या ‘नकुशी’ या मालिकेने शंभर भागांचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. नकुशीसारख्या सामाजिक प्रथेवर आधारित या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. ४३ दिवसांचं आऊडटोअर चित्रीकरण, कास पठारावरचं प्रेमगीत, कीर्तनाचा मालिकेच्या निवेदनासाठी केलेला वापर असे अनेक प्रयोग या मालिकेतून झाले.

मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात ‘स्टार प्रवाह’ने स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. स्टार प्रवाहने आजवर आशयसंपन्न आणि उत्तमोत्तम कार्यक्रम सादर केले आहेत. गेल्या वर्षभरात अनेक  नव्या उतमोत्तम मालिका स्टार प्रवाहने प्रेक्षकांसाठी सादर केल्या. या मालिकांपैकी नकुशी ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरते आहे. मराठी सॅटेलाईट टेलिव्हिजन वरचा प्रत्यक्ष ग्रामीण भागात चित्रीकरण झालेली ही पहिली मराठी मालिका.  आजपर्यंत सॅटेलाईट टेलिव्हिजन वरच्या मालिकांतून गावगाड्याचं चित्रण झालेलं नाही. ती उणीव ‘नकुशी.. तरीही हवीहवीशी’  या मालिकेतून भरून निघाली. नकुशी प्रथा ही एक अंधश्रद्धा असून, आजही ती ग्रामीण महाराष्ट्रात कायम आहे. एक किंवा दोन मुलींनंतर पुन्हा मुलगी झाल्यास तिचं नाव नकुशी ठेवले तर पुढचे अपत्य मुलगा होतो, असा एक समज आहे. या पार्श्वभूमीवर नकुशी नाव असलेल्या मुलीच्या आयुष्यात येणाऱ्या अनवट वळणांचा प्रवास, तिचं भावविश्व आजवर मराठी टेलिव्हिजनवर सादर झालेल्या नायिकांपेक्षा वेगळे ठरले.

या मालिकेतून अनेक नवे प्रयोग करण्यात आले.
या मालिकेचं तब्बल ४३ दिवसांचं आऊटडोअर चित्रीकरण करण्यात आलं. वाई आणि परिसरात हे चित्रीकरण झालं. प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे या मालिकेद्वारे प्रथमच टेलिव्हिजन मालिकेत अभिनेता म्हणून पदार्पण केलं. या मालिकेतलं प्रेमगीत कास पठारावर चित्रीत झालं होतं. राष्ट्रीय पुरस्कार विजेता गायक महेश काळेनं नकुशीचं टायटल साँग संगीतबद्ध केलं. या गाण्यानं त्याचा संगीतकार म्हणूव नवा प्रवास सुरू झाला. हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलं.

nakushi-100

या मालिकेचं कथानक महत्त्वाच्या वळणावर शहरात आलं, तेव्हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता आणि मोजक्या दर्जेदार भूमिका करणारा उपेंद्र लिमये हा रणजित शिंदे म्हणून या मालिकेत आला आणि एक वेगळीच उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली. रणजित शिंदेमुळे  नकुशीचं आयुष्यच बदलून जाणार का, तिच्या आयुष्यात काय होतं, हा कथानकाचा उत्कंठावर्धक प्रवास सध्या सुरु आहे. मुळात मुंबई सारख्या महानगरात राहणाऱ्या पण गावांशी जुळून असलेल्या अनेक कुटुंबांसमोरच्या अनेक प्रश्नांना या मालिकेत अप्रत्यक्षपणे सादर केले जाते आहे. अर्थात मालिकेची रंजकता कमी न करता, प्रेक्षकांना सामाजिक भान देणे  हा या मागचा उद्देश आहे.

‘दिया और बाती’सारखी लोकप्रिय मालिका देणाऱ्या  शशी सुमित प्रॉडक्शनची ही पहिली मराठी  निर्मिती असून, याचे दिग्दर्शन चित्रपट – मालिका क्षेत्रातला आघाडीचा दिग्दर्शक वैभव चिंचाळकरनं केलं आहे. अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचे छायांकन केलेल्या बाळू दहिफळे यांनी पहिल्यांदाच मराठी मालिकेचे छायाचित्रण केले आहे. उपेंद्र सोबत प्रसिद्धी आयलवार, आदिती देशपांडे, विद्याधर जोशी, स्वाती चिटणीस, चारुदत्त आफळे तसेच या चाळीतली इतर मंडळीसुद्धा लोकप्रिय ठरत आहेत. किंबहुना नकुशीतली बग्गीवाला चाळ मराठी प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरली आहे. सामाजिकतेचा आव न आणता, साध्यासोप्या आणि मनोरंजक पद्धतीने चित्रीत केलेली स्टार ‘प्रवाह’ची ही मालिका उत्कंठावर्धक होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 3:12 pm

Web Title: nakushi serial copleted 100 episodes
Next Stories
1 मी बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता, पण..
2 अक्कीच्या ‘हरे कृष्णा हरे राम..’ गाण्याची ‘कमांडो’ने केली कॉपी?
3 ‘रईस’ डॅडींच्या चित्रपटावर मुलांनी दिला रिव्ह्यू
Just Now!
X