परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘नमस्ते इंग्लंड’ हा चित्रपट ठरलेल्या तारखेच्या आधी प्रदर्शित होत आहे. या आठवड्यात म्हणजेच १९ ऑक्टोबरला ‘नमस्ते इंग्लंड’ प्रदर्शित होणार होता. मात्र ऐनवेळी प्रदर्शनाची तारीख बदलली त्यामुळे हा चित्रपट आता १८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या दिवशी दसरा आहे, तसेच सुट्टीही आहे त्यामुळे शुक्रवारऐवजी गुरूवारी ‘नमस्ते इंग्लंड’ प्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपटाच्या टीमनं घेतला आहे
‘तुम्ही लवकर बोलावलं आणि आम्ही आलो’ असं म्हणत ट्विटरवर अर्जुननं प्रदर्शनाची तारीख बदलली असल्याचं जाहीर केलं आहे. ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटाच्या निमित्तानं परिणीती- अर्जुन कपूर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे. याआधी ‘इश्कजादे’ या चित्रपटात ही जोडी दिसली होती. एक महत्त्वाकांक्षी पत्नी आणि तिला मिळवण्यासाठी वाट्टेल ते करणाऱ्या पतीची गोष्ट ‘नमस्ते इंग्लंड’मधून उलगडणार आहे. यात परिणीती जस्मीत आणि अर्जुन परमची भूमिका साकारणार आहे.
Aapne jaldi bulaya aur hum chale aaye! Namaste England is now releasing on 18th October! #NamasteEnglandOn18Oct@ParineetiChopra @NamasteEngFilm @RelianceEnt @PenMovies #VipulAmrutlalShah @jayantilalgada @sonymusicindia @ErosNow #BlockbusterMovieEntertainers pic.twitter.com/ITV6eamPLz
— Arjun Kapoor (@arjunk26) October 15, 2018
विपुल शाहनं या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. यापूर्वी ‘नमस्ते लंडन’चं दिग्दर्शन विपुल शहा यांनी केलं होतं. ‘नमस्ते लंडन’ हा चित्रपट खूपच गाजला होता त्यामुळे अर्थातच प्रेक्षकांच्या ‘नमस्ते इंग्लंड’ कडूनही खूप अपेक्षा आहेत. चित्रपटाच्या संपूर्ण टिमनं हा चित्रपट १ दिवस आधी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे, याच आठवड्यात आयुषमान खुरानाचा ‘बधाई हो’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे एक दिवस आधी चित्रपट प्रदर्शित करून ‘नमस्ते इंग्लंड’ ला याचा किती फायदा होतो हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 15, 2018 5:43 pm