१९९३ मध्ये ‘मिस इंडिया’चा किताब आपल्या नावावर केलेली नम्रता शिरोडकर आज तिचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. महेश बाबूसोबत विवाह बंधनात अडकल्यानंतर नम्रताने झगमगत्या दुनियेपासून दूर राहणेच पसंत केले. ‘मिस इंडिया’ झाल्यानंतर एका रात्रीत नम्रता शिरोडकर हे नाव भारताला कळले होते. ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेतही ती अंतिम पाचजणींमध्ये होती. २२ जानेवारी १९७२ मध्ये एका मराठी ब्राह्मण कुटुंबात नम्रताचा जन्म झाला. नम्रताची मोठी बहीण शिल्पा शिरोडकरही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तर नम्रताची आजीही अभिनेत्री होत्या.

नम्रताचे शिक्षण मिठीबाई महाविद्यालयात झाले. बालपणापासूनच तिच्यावर सिनेमांचे संस्करा कळत- नकळत होत असल्यामुळे तिला आजी आणि मोठ्या बहिणीप्रमाणे अभिनेत्रीच व्हायचे होते. १९९३ मध्ये मॉडेलिंगपासून नम्रताने आपल्या करिअरची सुरूवात केली. ‘जब प्यार किसी से होता है’ सिनेमात तिने एक छोटेखानी भूमिका साकारली होती. हाच तिचा पहिला सिनेमा होता. या सिनेमाआधी तिने ‘पूरब की लैला, पश्चिम का छैला’ सिनेमा साइन केला होता. मात्र काही कारणांमुळे हा सिनेमा प्रदर्शितच झाला नाही. यानंतर तिने महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वास्तव’ या सुपरहिट सिनेमात काम केले. ‘वास्तव’ सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा आयफा पुरस्कारही मिळाला होता. सुपरहिट सिनेमात काम केल्यानंतरही नम्रताला मात्र पाहिजे तसे सिनेमे मिळाले नाहीत.

‘पुकार’, ‘हेराफेरी’, ‘अस्तित्व’ ‘कच्चे धागे’, तेरा मेरा साथ रहे’ आणि ‘एलओसी कारगिल’ या सिनेमातील नम्रताचे काम वाखाण्याजोगे होते, पण या सिनेमांतील तिच्या भूमिका फार छोटेखानी होत्या. बॉलिवूडमधील अपयशानंतर तिने आपले लक्ष दाक्षिणात्य सिनेमांकडे वळवले. २००० मध्ये ‘वानसी’ या तेलगू सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान तिची ओळख सुपरस्टार महेश बाबूशी झाली. महेश बाबू नम्रतापेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २००५ मध्ये दोघांनी लग्न केले. त्यांना गौतम आणि सितारा ही दोन मुलंही आहेत. नम्रताने २००४ मध्ये ‘ब्राइड अॅण्ड प्रेज्युडाइस’ आणि ‘रोक सको तो रोक लो’ या सिनेमांत शेवटचे काम केले. लग्नानंतर नम्रताने सिनेसृष्टीला अलविदा म्हणत आपला संपूर्ण वेळ कुटुंबाला देणं योग्य समजलं.