गेल्या काही दिवसांपासून तनुश्री आणि नाना पाटेकर हा वाद पेटला आहे. एका मुलाखतीत तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तणूक तसेच मनसे पक्षाकडून कुटुंबियांना धमकावल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर कोरिओग्राफर गणेश आर्चायानं देखील नाना पाटेकर यांना साथ दिल्याचा आरोप तिनं केला. या सर्व आरोपांवर मौन बाळगून असलेले नाना पाटेकर ८ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन सगळ्या आरोपांवर स्पष्टीकरण देणार होते. मात्र नाना पाटेकर यांनी ही परिषद रद्द केल्याचं समजत आहे.

नाना पाटेकर यांची बाजू नेमकी काय आहे हे जाणून घेण्याचं कुतूहल प्रत्येकालाच होतं. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी त्रोटक प्रतिक्रिया नाना पाटेकर यांनी दिली होती. त्यामुळे नाना पाटेकर पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं, मात्र ऐनवेळी त्यांनी ही परिषद रद्द केली आहे. नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ताला कायदेशीर नोटीस बजावली होती. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नाना प्रसिद्धी माध्यमांसमोर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या परिषदेत नाना पाटेकर यांच्यासोबत गणेश आचार्यदेखील अनेक प्रश्नांना उत्तर देणार होता.

दरम्यान ‘हाऊसफुल्ल ४’ च्या चित्रिकरणासाठी नाना पाटेकर मुंबईबाहेर होते. नुकतेच ते मुंबईत परतले. विमानतळावर जमलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना तनुश्रीच्या आरोपांवर प्रश्न विचारले मात्र नाना पाटेकर यांनी माध्यमांच्या प्रश्नांवर प्रतिक्रिया व्यक्त करणं पूर्णपणे टाळलं.
तर दुसरीकडे तनुश्री दत्ता हिनं ओशिवरा पोलीस ठाण्यात नाना पाटेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत कोरिओग्राफर गणेश आचार्य, निर्माता सामी सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचादेखील उल्लेख आहे. २००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले, असा आरोप तनुश्रीने एका मुलाखतीत केला. नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे आरोप फेटाळून लावत तिला कायदेशीर नोटीस बजावली होती.