चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा केल्यापासून वादात सापडलेला संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ या सिनेमावरच्या बंदीला सर्वोच्च न्यायालयानं गुरूवारी स्थगिती दिली. या चित्रपटावर चार राज्यांनी बंदी घातली होती. बंदीच्या कचाट्यातून ‘पद्मावत’ हा सिनेमा एकदाचा सुटला आणि याचा मला खूपच आनंद झाला आहे अशी प्रतिक्रिया अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली आहे.

‘प्रत्येक चित्रपट हा प्रदर्शित व्हायलाच हवा. चित्रपट प्रदर्शनाच्यावेळी अनेकदा वाद होतात, पण चित्रपट योग्यरित्या तयार केला असेल, त्यात विषयाची मांडणी योग्यरितीनं केली असेल तर चित्रपट प्रदर्शित होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जर चित्रपटात काही चुकीचं दाखवलं असेल तर नक्कीच लोक राग काढतील पण, चित्रपटात काहीच चुकीचं नसेल तर लोक का राग काढतील? असा प्रश्न नानांनी विचारला आहे. ‘एखादी गोष्ट तुम्ही लोकांपुढे कशाप्रद्धतीनं सादर करतात यावर त्यांच्या प्रतिक्रिया अवलंबून असतात. कोण मनापासून बोलत आहे आणि कोण फक्त लक्ष वेधण्यासाठी एखादी गोष्ट करत आहे यातला फरक लोकांना सहज कळतो. हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि त्यावर चार राज्यात घालण्यात आलेल्या बंदीलाही न्यायालयानं स्थगिती दिली, आणि या निर्णयाचा मला सर्वात जास्त आनंद झाला आहे’ अशा शब्दांत नाना पाटेकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सेन्सॉरची कात्री आणि त्यानंतर बंदीच्या कचाट्यात सापडलेला ‘पद्मावत’ हा सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. यात राणी पद्मावतीची प्रतिमा मलिन करण्यात आली असल्याचा आरोप करत करणी सेनेसह विविध संघटनांनी या चित्रपटाला विरोध केला होता. तसेच गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि हरयाणामध्ये अधिसूचना काढून या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती.