‘आपला मानूस’च्या निमित्ताने नाना पाटेकर ‘फोकस’मध्ये असतानाच एक खास गोष्ट म्हणजे मराठी चित्रपटातील त्याची स्वतंत्र वाटचाल. तसे त्याचे मराठी व हिंदी अशा दोन्हीतील प्रगती पुस्तक भरपूर गुणांचे आहे. मराठीतील त्याचा पहिला चित्रपट ‘भालू’ (१९८०). उमा प्रकाश भेंडे निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन राजदत्त यांचे होते. नाना एकेक मराठी चित्रपट व नाटकातील भूमिका साकारत वाटचाल करु लागला. त्याच वाटचालीतील ‘राघु मैना’ (१९८३) हा महत्वपूर्ण चित्रपट. ढोलकीवादक नाना पाटेकर व जोडीला नृत्यांगना मधु कांबिकर असा छानसा योग. दोघेही अभिनयात तरबेज. म्हणूनच तर यातील सर्वोत्त्कृष्ट अभिनयासाठीचा त्या वर्षीचा शिवाजी गणेशन राज्य पुरस्कार नाना पाटेकरने पटकावला. नानाच्या चौफेर अष्टपैलु कारकिर्दीतील हा पहिला मानाचा पुरस्कार होय.

या चित्रपटाचे वैशिष्ट्य इतक्यावरच थांबत नाही. तर याच ‘राघु मैना’ला राज्य शासनाकडून सर्वोत्तम प्रथम क्रमांकाचा चित्रपट (अक्षर फिल्म्स इंटरनॅशनल, अकोला), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक राजदत्त, कथा व पटकथा वसंत सबनीस, कला दिग्दर्शक किशोर मोरे हे पुरस्कार देखील प्राप्त झाले. एकूण तेवीसपैकी सहा पुरस्कार हे विशेषच.

डॅडी देशमुख निर्मित या चित्रपटात तमासगीरांची कथा-व्यथा होती. चित्रपटाची गीते विठ्ठल वाघ, डॅडी देशमुख व श्रीकृष्ण राऊत यांची होती व संगीत विश्वनाथ मोरे यांचे होते. ‘ऐका आम्ही आज सांगतो…’, ‘तुमचं नाव गाव काय सांगा की…’, ‘नदी काठी मी एकाकी करीत होते आंघोळ…’ इत्यादी गाण्यांचा समावेश होता. चित्रपटात निळू फुले, राघवेन्द्र कडकोळ, अशोक सराफ असे दमदार कलाकार देखील होते. नाना पाटेकरच्या कारकिर्दीतील हा एक महत्त्वाचा चित्रपट आहे. विशेषत: नाना पाटेकरचे ग्रामीण रुप हे या चित्रपटाचे विशेष होय. नानाच्या रुपेरी प्रवासाचे टप्पे विचारात घेताना ‘राघु मैना’ वेगळेपण दर्शवितो.
दिलीप ठाकूर