लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सभा, बैठकी, दौरे, भाषणांमधून प्रचार सुरु झाला आहे. खऱ्याखुऱ्या प्रचाराबरोबरच ऑनलाइन प्रचारही यंदा जोरात आहे. अनेक मेसेजेस आणि पोस्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत उमेदवार आणि त्यांचे समर्थक पोहचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र अशाप्रकारच्या सगळ्याच पोस्ट खऱ्या असतात असं नाही. सध्या अभिनेता नाना पाटेकर यांच्या नावानेही अनेक मेसेज व्हायरल होताना दिसत आहे. मात्र यासंदर्भात खुद्द नानांनीच ट्विट करुन आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसून मी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही असं म्हटलं आहे.

नानांच्या नावाने सध्या अनेक फोटो व्हायरल होत असून यामध्ये त्यांनी अमूक एका पक्षाला किंवा उमेदवाराला समर्थन दिले आहे अशा आक्षयाचा मजकूर असतो. मात्र या फोटोंमागील खरं सत्य नानांनीच ट्विट करुन सांगितले आहे. आपल्या ट्विटमध्ये नाना म्हणतात, ‘नाम फाऊंडेशनच्या कामानिमित्त गावोगावी फिरताना अनेक लोक भेटायला येतात आणि पुष्पगुच्छ देऊन फोटो काढतात. काही मंडळी अशा फोटोंचा गैरवापर करीत आहेत. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाहीं. कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही.’

नाना पाटेकर यांनी या आधीही अनेकदा व्हॉटस्अपवर व्हायरल होणाऱ्या मेसेजेसबद्दलही आपला त्या मेसेजसची काहीही संबंध नसल्याचे सांगितले होते. निवडणुकांच्या काळामध्ये अनेकदा प्रभावशाली व्यक्तींचे फोटो आणि त्याबरोबर चुकीची माहिती व्हॉट्सअप, फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवरुन व्हायरल होते. अनेकदा नव्याने ही माध्यमे वापरणाऱ्यांना ही माहिती खरी वाटते. त्यामुळेच नानांनी हे ट्विट करुन असल्या खोट्या प्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.