अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांवर आपली बाजू मांडण्यासाठी नाना पाटेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. खरंतर त्यांनी ही पत्रकार परिषद रद्द केल्याची आधी चर्चा होती. पण अचानक ते प्रसारमाध्यमांपुढे आले आणि अवघ्या एका मिनिटात त्यांनी ही पत्रकार परिषद आटोपली. तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवली असून ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काहीच बोलता येणार नाही. तसेच वकिलांनी मला प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई केली आहे, असं ते म्हणाले.

तनुश्रीने केलेल्या आरोपांवर नाना पाटेकर सविस्तरपणे बोलतील आणि सर्व प्रश्नांची उत्तरे देतील अशी अपेक्षा होती. गेल्या काही दिवसांपासून नाना जैसलमेरमध्ये ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होते. ही शूटिंग संपल्यावरच ते या प्रकरणावर भाष्य करणार म्हणून सांगण्यात आलं. शूटिंग संपवून ते जेव्हा मुंबईला परतले तेव्हा विमानतळावरच पत्रकारांनी त्यांना गाठलं. ‘जे खोटं आहे ते खोटंच राहणार,’ हीच प्रतिक्रिया त्यांनी तेव्हा दिली.

२००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले, असा आरोप तनुश्रीने एका मुलाखतीत केला. नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे आरोप फेटाळून लावत तिला कायदेशीर नोटीस बजावली होती. त्यानंतर तनुश्रीनेही मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात नाना पाटेकर, कोरिओग्राफ गणेश आचार्य, दिग्दर्शक राकेश सारंग, निर्माते सामी सिद्दीकी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली. आता या संपूर्ण प्रकरणाला काय वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.