सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com
मुलाखत

मोजक्याच चित्रपटांतून पण दमदारपणे पडद्यावर दिसणारी, नाटकांवर त्यातही प्रायोगिक रंगभूमीवर मनापासून प्रेम करणारी अशी ही कलाकार. नुकत्याच आलेल्या ‘आणि.. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटात काशिनाथ घाणेकरांच्या पहिल्या पत्नीची भूमिका साकारणारी नंदिता धुरी हिच्याशी केलेली बातचीत..

प्रायोगिक रंगभूमी किंवा अगदी व्यावसायिक नाटकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या रक्तात नाटक भिनलेले असते असे म्हणतात. त्यात काम करायचंच अशी त्यांची ओढ असते आणि त्यासाठी ते अगदी सुरुवातीपासून प्रयत्न करत असतात. त्यामुळेच नंदिता नाटकांकडे कशी वळली हे पाहिल्यास त्यात वेगळीच कथा दिसते. नंदिता सांगते, ‘‘मी नाटकात काम करणार, करिअर करणार असं कधीच ठरवलं नव्हतं. किंबहुना रुपारेलमध्ये शिकत असताना माझं सारं लक्षं हे एनसीसीकडे होतं. त्यातही रिपब्लिकन डे परेडसाठी माझी निवड व्हावी यासाठी मी कठोर मेहनत घेत होते. त्यासाठीचे जे काही कॅम्प होत त्यात माझी निवड झाली होती. पण शेवटच्या चाळणीत मला वगळण्यात आलं. त्यामुळे मला एक प्रकारे नैराश्यच आलं होतं. मी रुपारेलमध्ये होते आणि तेथे नाटकाचं वातावरण अगदी नेहमीचं होतं. माझ्या एका मित्राने तेव्हा ‘नाटकात ये, किमान तुझ्यातील नैराश्य कमी होईल’ असं सुचवलं. माझा तसा काही नाटकाचा वगरे िपड नव्हता. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी मी नाटकासाठी प्रयत्न केला आणि निवडदेखील झाली. चेतन दातार आणि दीपक राजाध्यक्ष वगरे मंडळी आमचं नाटक बसवायला यायचे. माझी निवड झाली आणि एक वेगळंच विश्व माझ्यापुढे खुलं झालं असं म्हणता येईल. या दिग्गजांच्या तालमीत मी तयार झाले आणि त्यावर्षी मला अनेक पारितोषकंदेखील मिळाली. हा माझ्यासाठी टìनग पॉइंट होता.’’

Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
jalgaon, raver lok sabha seat, rohini khadse, eknath khadse, facebook page, remove father s image, ncp sharad pawar, bjp, maharashtra politics, lok sabha 2024, election 2024, marathi news,
रोहिणी खडसे यांच्या फेसबुक पानावर एकनाथ खडसे यांच्या छायाचित्रास फाटा
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…

नाटकाशी नाळ जोडली गेली असली तरी नंदिता नाटकाकडे करिअर म्हणून पाहात नव्हती. त्यामुळेच पदवी घेतल्यावर नोकरी सुरू झाली आणि चेतन दातारमुळे आविष्कारची ओळख झाली. त्यातूनच मग प्रायोगिक रंगभूमीची आवड निर्माण झाली. महत्त्वाचे म्हणजे नोकरी सांभाळून तिला ही आवड, हौस जोपासता येत होती. नोकरीतील वरिष्ठांचं सहकार्य तिला मिळत असल्याचं ती आवर्जून सांगते. पण त्या कॉर्पोरेट आयुष्याचा तिला लवकरच कंटाळा आला. रंगभूमीवर आपलं मन रमतं हे तिला पुन:पुन्हा जाणवत होतं. त्यामुळे अखेरीस तिने दुसरी नोकरीदेखील सोडून दिली आणि पूर्ण वेळ रंगभूमीकडे वळली. नंदिता सांगते, ‘‘चेतनच्या कार्यशाळांचा तिला खूप फायदा झाला, आविष्कारमुळे तिला अनेक प्रायोगिक नाटकांमध्ये काम करता आलं. त्याला पारितोषकंदेखील मिळत होती. नोकरी सोडल्यावर मात्र ती पूर्णवेळ त्यावरच लक्ष केंद्रित करू लागली. एके दिवशी आविष्कारमधून तिला फोन आला की सुषमा देशपांडे संत स्त्रियांवर एक नाटक करणार आहेत, त्यात तिला भूमिका करायची आहे.’’

प्रायोगिक रंगभूमी असली तरी या नाटकाने तिला एक वेगळी ओळख मिळाली. चेतन दातारच्या मृत्यूनंतर प्रायोगिक रंगभूमीवर जी एक पोकळी निर्माण झाली होती. त्यानंतर सुषमा देशपांडे यांचं ‘बया दार उघड’ हे नाटक आलं होतं. तो प्रयोग नक्कीच वेगळा होता. नंदिता सांगते, ‘‘या नाटकाने खूप काही दिलं, खूप शिकायला मिळालं. संत स्त्रियांच्या आयुष्यावर बेतलेलं हे नाटक पूर्णपणे समजावं यासाठी आम्ही सारे कलाकार आणि सुषमा देशपांडे वारीमध्ये सहभागी झालो. तेथील वातावरण, लोकांचा भक्तिभाव हे सारं अनुभवलं आणि मग नाटक स्टेजवर अवतरलं. या नाटकाने एक वेगळीच ओळख निर्माण झाली. इतकंच नाही तर प्रायोगिक नाटक असूनदेखील याचे १५० प्रयोग झाले. या नाटकात चौघीजणी वारीला जात असतात. त्यांच्या बोलण्यात संत स्त्रियांचा विषय असतो. मग त्यातील प्रत्येक जण एका संत स्त्रीचे पात्र साकारते. संत स्त्रियांनी मांडलेले विचार फारसे आपल्याला माहीत नसतात. या नाटकाच्या अनुषंगाने नंदिताला आलेल्या अनुभवाबद्दल ती सांगते की, आज आपण महिलांच्या अनेक प्रश्नांबद्दल बोलत असतो, पण या स्त्रियांनी त्याबद्दल तेराव्या शतकातच खूप काही सांगितलं आहे. आज महिलांची अभिव्यक्ती, मासिक पाळी, त्यांच्यावरील अत्याचार असे खूप काही बोलले जाते, पण या नाटकाच्या निमित्ताने तेराव्या शतकातील संत स्त्रियांचे विचार पाहिल्यावर, आज आपण नवीन काय मांडतो आहोत असा प्रश्न पडतो.’’

संत स्त्रियांचे काम करतानाचे अभंग वगरे मांडत पुढे जाणारं हे नाटक म्हणजे एक संगितिकाच होती असं नंदिताला वाटतं. अरूण काकडे यांच्या इच्छेमुळेच या नाटकाचे दीडशे प्रयोग होऊ शकल्याचं ती आवर्जून नमूद करते. या नाटकामुळे तिला पहिला झी गौरव पुरस्कारदेखील मिळाला. पुढे सुषमा देशपांडे यांच्या बरोबर अनेक कामं करायला मिळाली. याच नाटकाने तिच्या चित्रपट प्रवेशाची नांदीदेखील झाली होती.

‘बया दार उघड’च्या एका प्रयोगाला परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी आले होते. प्रयोग संपल्यानंतर त्यांनी तिला भेटून कधीतरी कामासाठी बोलवू असं सूचक विधान केलं होतं. तेव्हा ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाची कसलीच चर्चा नव्हती. पण हा चित्रपट करायचं ठरलं तेव्हा त्या दोघांनी तिला आवर्जून बालवलं. तोपर्यंत नंदिताच्या डोक्यात व्यावसायिक सिनेमा किंवा व्यावसायिक नाटक याबद्दल काहीच विचार नव्हता. नंदिता सांगते, ‘‘मला आधी वाटलं की माझी ऑडिशन होईल की काय. पण मला त्यांनी एक साडी घेऊन बोलावलं होतं. कथा सांगितली. दोन मुलांची कथा होती. आणि त्यांनी त्या मुलांच्या आईची भूमिका मला करायची संधी मला दिली.’’ नंदितासाठी हे सारंच स्वप्नवत होतं. ‘बया दार उघड’मुळे विठ्ठल, पंढरपूर यांची ओढ निर्माण झाली होतीच आणि हा चित्रपट तर थेट पंढरपुरातच होणार होता. नंदिता सांगते की, परेश मोकाशींबरोबर काम करायला मिळणं हीच खूप मोठी संधी होती. त्यात पुन्हा त्यांचे चित्रपट वास्तववादी असतात हे माझ्यासाठी खूपच महत्त्वाचं होतं.

दोन लहान मुलांची काहीशी त्रासिक, पण त्याच वेळी जिद्दीने संसाराचा गाडा खेचणारी आई ही भूमिका आव्हानात्मक होतीच, पण त्याच वेळी नाटकातून चित्रपटाकडे वळण्याचं आव्हानदेखील होचं. त्यामुळे नाटक की चित्रपट या सतत चíचल्या जाणाऱ्या प्रश्नावर ती सांगते, ‘‘हे खरं तर एक पायरी वर जाण्यासारखं आहे. दोन्ही माध्यमं वेगळी आहेत. त्यातील आव्हानं वेगळी आहेत. नाटकात आपण स्वत:ला मोकळं सोडून काम करतो, चित्रपटात ठरावीक चौकटीत तेवढंच व्यक्त व्हायचं असतं, पण ते वरच्या पट्टीत होऊन चालत नाही. ‘एलिझाबेथ’ करताना हे खूप जाणवलं. पहिलाच चित्रपट, तो परेश मोकाशींसारख्या दिग्दर्शकासोबतचा. एका क्षणी मी रडकुंडीलाच आले होते. हे काही आपल्याला जमत नाही असं वाटू लागलं होतं. पण परेश मोकांशींनी खूप शांतपणे समजावून सांगितलं. त्यांनीदेखील रंगभूमीवर काम केलं होतं, त्यांना माझी अडचण नेमकी समजली. कॅमेऱ्यासमोर वावरताना नाटकातील वरची पट्टी ५० टक्क्यांनी कमी करायला लागते, पण विषय पोहोचवण्याची तीव्रता तेवढीच ठेवावी लागते. या अशा अनेक बाबी असल्या तरी नाटकातून चित्रपटात जाणं हे काही फारसं अडचणीचं आहे असं मला वाटत नाही. आणि मी नाटकाकडे परत कधीही जाऊ शकते. कारण रंगभूमी एखाद्या शाळेसारखी असते. शिवाय प्रयोग करून पाहायला, शिकायला थिएटरसारखी दुसरी जागा नाही.

पण चित्रपटातदेखील अनेक प्रयोग होत असतात. ‘एलिझाबेथ’मध्ये मी किमान मेकअपमध्ये होते. आहे त्यापेक्षा सावळं दिसायचं होतं. परेश मोकाशींच्या कामाची पद्धत वेगळीच होती. मला दोन मिनिटांत साडी नेसून तयार व्हावं लागायचं आणि ती साडीदेखील व्यवस्थित नेसलेली नसणं, घरगुती दिसणं गरजेचं होतं.  परेश मोकाशींकडून असेच तपशील मिळाले होते. जे साधं आहे ते साधंच दिसायला हवं यावर त्यांचा कटाक्ष असायचा. त्यातून पात्र उमजणं गरजेचं आहे. ते खरं दिसायला हवं, सुंदर आणि ग्लॅमरस दिसायची गरज नसते. या सर्वामुळेच ‘एलिझाबेथ’मधील साधेपणादेखील सर्वाना भावणारा आणि आजही लक्षात राहणारा असावा, असं नंदिताला वाटतं.

‘एलिझाबेथ’नंतर लगेचच ‘रंगा पतंगा’ हा चित्रपट नंदिताने केला. हा आणखीनच वेगळ्या ट्रॅकवरचा चित्रपट होता. दुष्काळी भागातील एका मुस्लीम जोडप्याची ही कथा. त्यात मकरंद अनासपुरे यांच्या पत्नीची भूमिका तिने साकारली. वेगळ्या धर्मातील पात्र, त्यात पुन्हा प्रत्यक्ष दुष्काळी भागातील चित्रीकरण, तेथील भाषेचा लहेजा वेगळा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मकरंद अनासपुरे यांच्यासारखा ज्येष्ठ अभिनेता समोर होता. मकरंद यांची तशी ओळख विनोदी कलाकार म्हणून. पण त्यांची या चित्रपटातील भूमिका एकदमच त्यांच्या या ओळखीशी विसंगत असणारी होती. नंदिता हाच मुद्दा महत्त्वाचा मानते. भूमिकेच्या गरजेनुसार कलाकाराने बदलणं आवश्यक असतं. ते तिने मकरंद यांच्या बाबतीत अनुभवलं होतं. स्वत:लाही तसं तिला आजमावून पाहायला आवडणार होतं. ‘रंगा पतंगा’ बॉक्स ऑफिसवर फार चालला नसला तरी त्याची दखल घेतली गेली. असे चित्रपट साकारण्यासाठी उत्तम दिग्दर्शक मिळणं गरजेचं असल्याचं नंदिता नमूद करते. ‘रंगा-पतंगा’मध्ये प्रसाद नामजोशीमुळे हे तिला सहज शक्य झालं होतं.

एक कलाकार म्हणून तुम्ही सर्व प्रकारच्या भूमिका आजमावून पाहणं गरजेचं असल्याचं नंदिताचं मत आहे. त्यामुळेच तिने प्रायोगिक नाटक आणि सिनेमा करतानाच टीव्ही मालिकेमध्येदेखील काम केलं. मंदार देवस्थळी यांच्या ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतल्या वैभव मांगले यांच्यासोबतच्या भूमिकेमुळे ती अनेक प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. टीव्हीवर ती फारशी रमली नसली तरी एक कलाकार म्हणून हे आव्हानदेखील स्वीकारणं गरजेचं असल्याचं मत ती व्यक्त करते. रंगभूमीवरचा कलाकार टीव्हीकडे कसा पाहतो यावर ती सांगते, ‘‘टेलिव्हिजन म्हणजे रोजचं आव्हान असतं. रोज त्याच कथेत तेच काम करत राहायचं असचं आणि तरीदेखील कामातील ताजेपणा टिकवून ठेवायचा असतो. त्या पात्रामध्ये जीव ओतावा लागतो, परफॉर्मन्स टिकवून ठेवावा लागतो आणि त्यातील तुमचा रस टिकवून काम करावं लागतं. तसं झालं तर तुमचं पात्र प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचतं. त्यात पुन्हा कथेची सूत्रं वाहिन्यांच्या हातात असतात. अशा वेळी अनेक बदल होत असतात. ते होत असताना त्या बदलत्या कथेशी जुळवून घेत सतत तुमच्यात बदल करत राहणं हे महत्त्वाचं असते. अर्थातच मोठय़ा प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे एक उत्तम माध्यम आहे हे मात्र नक्की.’’

त्यानंतर नंदिता टीव्ही मालिकांकडे फारशी वळली नाही. किंबहुना नाटकातून तिला हवं ते मिळत होतं. पण त्याच वेळी एखादा कलाकार एका ठरावीक पद्धतीच्या भूमिकांसाठी सातत्याने ओळखला जाऊ लागला की त्याचावर तसा शिक्का बसण्याचा संभव असतो. नंदिताच्या बाबतीत साडी नेसलेली एक घरगुती सोशिक घरगुती महिला असा काहीसा शिक्का तिच्यावर बसला आहे का असं तिला विचारलं असता, जवळपास तसंच झालं असल्याचं ती सांगते. पण त्याच वेळी एक कलाकार म्हणून सतत एकाच प्रकारच्या भूमिका करण्यापेक्षा नवीन काहीतरी करायचं असल्याचं ती नमूद करते. त्यामुळे तिला जेव्हा‘ कॉमेडीची जीएसटी एक्स्प्रेस’ हा टीव्हीवरील कार्यक्रम मिळाला तेव्हा तोदेखील तिने जाणीवपूर्वक स्वीकारला. नंदिता सांगते, ‘‘नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करण्यासाठी ते मला गरजेचं होतं. माझ्यासाठी तो एक प्रयोगच होता. त्यातील कामाबद्दल बोलायचं तर ते चांगलं पण नाही आणि वाईटही नाही असं म्हणता येईल.’’ त्यानंतर ती पुन्हा नाटकाकडे वळली. सध्या ती करत असलेलं ‘आमच्या हिचं प्रकरण’ हे विनोदी बाजाचं व्यावसायिक नाटक आहे. हे नाटक प्रेक्षकांसाठीदेखील धक्काच होता. म्हणजे ही अशा भूमिका पण करू शकते, असा प्रतिसाद हा नक्कीच एक चांगला ब्रेक असल्याचं तिला वाटतं. यापूर्वीच्या भूमिकांपेक्षा वेगळं करायला मिळणं हे नक्कीच चांगलं असतं. ‘आमच्या हिचं प्रकरण’ सध्या रंगभूमीवर गाजत आहे. आणि त्याच वेळी ‘आणि.. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटातून नंदिता पडद्यावरदेखील दिसत आहे.

काशिनाथ घाणेकरांच्या पहिल्या पत्नीची भूमिका तिच्याकडे कशी आली याबद्दल ती सांगते, ‘‘एकदा निखिल साने यांनी मला फोन करून अभिजीत देशपांडे यांना भेटायला सांगितलं. एक बायोपिक आहे एवढंच त्यांनी सांगितलं होतं. अभिजीत यांना भेटल्यावर त्यांनी ‘घाणेकर’ची कथा ऐकवली. घाणेकरांच्यावरील चित्रपटात मला कोणतीही भूमिका करायला मिळाली असती तर ती हवी होती. जेव्हा अभिजीत यांनी मला घाणेकरांच्या पहिल्या पत्नीची इरावतीची भूमिका करायची हे सांगितलं तेव्हा मी उडालेच. इरावतीबाईंचं काम हे मोठंच होतं. काशिनाथ घाणेकरांसारख्या अभिनेत्याला सांभाळणं हे क्रेडिट होतंच, पण त्या त्यांच्या क्षेत्रातील मोठय़ा व्यक्ती होत्या. एक उत्तम स्त्रीरोगतज्ज्ञ अशी त्यांची ख्याती होती. कलाकाराच्या क्षेत्रात त्याला सतत ओळख मिळत असते, म्हणून इतर क्षेत्रं कमी ठरत नसतात. इरावतीबाईंचं अतिशय संतुलित आणि परिपक्व वागणं आणि त्याच वेळी खंबीरपणा हे सारंच खूप वेगळं होतं. त्यांची स्वत:ची म्हणून एक प्रतिष्ठा होती, ती सांभाळून ही भूमिका मला साकारायची होती. आणि अर्थातच अभिजीत यांच्याकडे दिग्दर्शक म्हणून इतकी स्पष्टता होती की आम्हाला त्यासाठी फार कष्ट करावे लागले  नाहीत.’’ एकूणच चित्रपट असो की नाटक, उत्तम दिग्दर्शक प्रत्येक ठिकाणी लाभल्याने भूमिका साकारणं कायमच सहजसोपं झाल्याचं नंदिता आवर्जून सांगते.

प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक, टीव्ही आणि चित्रपट अशा सर्वच प्रकारच्या कामात नंदिताने स्वत:ला सिद्ध केलं आहे. सध्या टीव्हीकडे ती फारशी पाहात नाही. पण प्रायोगिक नाटकात तिचे प्रयोग सुरूच आहेत. वसंत देव यांचं ‘अरण्य किरण’ हे िहदीतलं नाटक सध्या ती मराठीत करत आहे. महाभारत युद्धानंतर त्यातील विविध पात्रं कृष्णाबद्दल काय वाटतं हे त्यातून मांडतात. अनेक पात्रांच्या स्वगतासारखं हे नाटक आहे. त्यात ती गांधारीची भूमिका साकारत आहे. नुकतंच तिच्या एका मराठी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून पुढील वर्षी तो चित्रपट पडद्यावर येणार आहे. नाटक आणि चित्रपट एकत्र सुरू असताना धावपळ होत असते, पण नाटक हे तिचं पहिलं प्रेम आहे. नाटक पाहून प्रेक्षक नंतर ते विसरून जात असतील असं तिला सुरुवातीला वाटायचं, पण तिच्या प्रायोगिक नाटकांबद्दल लोक भेटल्यावर आवर्जून सांगतात तेव्हा त्याचा तिला खूप आनंद होतो. ती सांगते, ‘‘आजचा प्रेक्षक चोखंदळ आहे. मग तो प्रायोगिकचा असो की व्यावसायिक नाटकांचा असो.’’

अर्थातच एक कलाकार म्हणून अनेक प्रयोग करत असताना स्वत:ला काय आवडतं असा प्रश्न पडतोच. नंदिता यावर म्हणते, ‘‘प्रायोगिक नाटक ही माझी शाळा आहे. व्यावसायिक नाटकाची गणितं ठरलेली असतात. तेथे वेगवेगळ्या भूमिका करायला मिळतात, पण क्षमतांचा कस प्रायोगिक नाटकांमध्ये अधिक लागतो. आनंदासाठी ते केलं जातं. आनंदासाठी काम करताना त्याच क्षेत्रात तुम्हाला करिअर करायला मिळालं तर आणखी काय हवं? करिअर केवळ आनंदासाठी न करता त्यात उद्दिष्ट ठरवून काम करणं गरजेचं आहे हे नक्की. त्यामुळे अमुक एक करायचं आणि अमुक नाही असं मी ठरवलेलं नाही. एक कलाकार म्हणून सर्वच ठिकाणी मला काम करायचं आहे. मला माझी कुंपणं तोडून अडथळे पार करून काम करता येईल हेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं असेल.’’