भारतीय रंगभूमी आणि समांतर चित्रपट या दोन्ही क्षेत्रांमध्ये आपल्या अभिनयाने नुसता ठसाच नाही, तर एक वेगळे दालन उघडणाऱ्या नसिरुद्दीन शाह यांच्या ‘अँड देन वन डे’ या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद ‘आणि मग एक दिवस..’ शुक्रवारी प्रकाशित झाला. पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेला हा अनुवाद तेवढय़ाच तोलामोलाच्या दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांनी केला. या अनुवाद प्रकाशनाच्या सोहळ्यानंतर ज्येष्ठ सिने पत्रकार खालिद मोहम्मद यांनी नसिरुद्दीन शाह आणि सई परांजपे यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीतून या दोन्ही दिग्गजांना एकमेकांबद्दल वाटणारा जिव्हाळा, एकमेकांच्या कामाबद्दलचा आदर, अनुवाद करताना सई परांजपे यांना आलेल्या अडचणी, पुस्तकातील नसिरुद्दीन शाह यांनी मांडलेली परखड मते असे विविध पैलू रसिकांसमोर उलगडले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या मुलाखतीला शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न..

खालिद मोहम्मद – एका अर्थाने नसिरने लिहिलेल्या आत्मचरित्राचा अनुवाद होत असताना त्या प्रक्रियेत मी खूप जास्त गुंतलो होतो. कारण अनेकदा सकाळी सकाळी सई फोन करून त्यांना अडलेल्या अनेक गोष्टी, अनेक म्हणी किंवा वाक्प्रचार विचारायच्या. त्या ‘गूगलस्नेही’ नसल्याने कदाचित मला विचारत असाव्यात. मग मीदेखील खूप ज्ञानी वगैरे असल्याचा आव आणत ‘गूगल’चाच आसरा घेऊन त्यांच्या शंकांचं निरसन करायचो. पुढे पुढे हे फोन अगदी नियमित झाले. पण त्यात मजा होती. आणि त्याच अधिकाराने काही टोकदार प्रश्न सई परांजपे यांना विचारण्याची सवलत मी आज घेणार आहे. माझा पहिला प्रश्न असा की, अनुवाद करताना कोणते अडथळे जाणवले?

* सई परांजपे – खालिद, तू म्हटल्याप्रमाणे यातला सर्वात मोठा अडथळा म्हणजे नसिरची भाषा! त्याने लिहिलेलं आत्मचरित्र अत्यंत ओजस्वी आणि ओघवत्या इंग्रजीत असलं, तरी त्यातील काही वाक्यरचना किंवा शब्द यांच्यापाशी येऊन मी थबकायचे. असे अवजड शब्द वापरण्याची नसिरला सवयच आहे. काही शब्दांचे अर्थ तर शब्दकोशात डोकावूनही मिळत नव्हते किंवा संपूर्ण वाक्य वाचून त्या शब्दाचा अर्थ लावण्याची कसरतही योग्य ठरत नव्हती. पुस्तकाचा अनुवाद पूर्ण होईपर्यंत नसिरला अजिबात त्रास द्यायचा नाही, संपूर्ण पुस्तकाचा अनुवाद झाल्यानंतर एकदाच त्याचा भरपूर वेळ घेऊन मग ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करायच्या हे आधीच ठरलं होतं. पण एक गोष्ट नक्कीच सांगावीशी वाटते. ती अशी, हे असे माझा अनुवादाचा प्रवाह अडवणारे कठीण उतारे वगळल्यास संपूर्ण अनुभव व प्रवास आनंददायी होता. नसिरने लिहिलेला ऐवज खूप मोलाचा आहे. तो मराठीत आणायलाच हवा. तो आणायची संधी मला मिळाली, याबद्दल मी स्वत:ला नशीबवान समजते.

खालिद मोहम्मद – तुम्ही याआधी कधीच अनुवाद केलेला नाही. का?

* सई परांजपे – (हसत आणि अगदी टेचात मान उडवून) का? का म्हणजे, अरे मी स्वत: लेखिका आहे. (प्रेक्षकांमधून प्रचंड हशा आणि खालिद मोहम्मद यांच्या चेहऱ्यावरही हास्य.)

खालिद मोहम्मद – हो, हो. पण तुम्ही गोगोलच्या काही नाटकांचा अनुवाद केला आहे, असं मला स्मरतं!

* सई परांजपे – (खोटं खोटं रागावून खालिदकडे बघून) खालिद, तू खरोखरच धूर्त आहेस. पण बरोबर. मी गोगोलचं एक नाटक हिंदीत ‘जी हुजूर’ या नावाने अनुवादित केलं होतं. दिल्लीत आम्ही ते केलं होतं. आणखी एक नाटक मी ‘आयी बला को टाल तू’ आणि ‘इडा पिडा टळो’ असं हिंदी आणि मराठी या भाषांमध्ये अनुवादित केलं होतं. ते वगळता अनुवादाच्या वाटय़ाला मी गेलेली नाही.

खालिद मोहम्मद – नसिर, तुझ्याकडून सईंना काही सूचना केल्या होत्यास का?

* नसिरुद्दीन शाह – नाही, नाही. अजिबातच नाही. सईच्या लेखनाबद्दल मला नेहमीच आदर वाटत आला आहे. सईच्या विनोदी शैलीचाही मी चाहता आहे. खासकरून संवाद लिहिण्यातली तिची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. मानवी स्वभाव जाणण्यात ती माहीर आहे. त्यामुळे तिचं नाव अनुवादासाठी पुढे आल्यावर मी एका फटक्यात मंजूर करून टाकलं. त्यामुळे तिला काही सूचना देण्याचा प्रश्नच नव्हता. खरं तर, इथे येताना मी अनुवादित पुस्तकातील काही पानं वाचत होतो. मला कुठेही अडखळल्यासारखं वाटलं नाही. किंबहुना सईने केलेला अनुवाद खूपच उत्तम झाला आहे. मी खूश आहे.

खालिद मोहम्मद – इंग्रजीत हे पुस्तक प्रसिद्ध होऊन वर्ष लोटून गेलं आहे. त्यानंतर काय प्रतिक्रिया आल्या? खासकरून चित्रपटसृष्टीतून!

* नसिरुद्दीन शाह – माझे दोन्ही भाऊ माझ्यापेक्षा मोठे आहेत. ते दोघेही माझ्या वडिलांना आदर्श मानतात आणि मी अजिबातच मानत नाही. त्यांच्यापैकी एक आत्मचरित्रावर खूप नाराज होता. त्याच्या मते कुटुंबीयांबाबत लिहिताना मी खूपच अन्याय वगैरे केला. पण मी त्याला ते पुस्तक पुन्हा एकदा वाचायला सांगितलं. तसंच वाक्यांमध्ये दडलेला अर्थ शोधण्याचा सल्ला दिला. त्याने ते आत्मचरित्र पुन्हा वाचलं आणि त्याचं समाधान झालं असावं बहुधा! आत्मचरित्र लिहिताना मला आठवणाऱ्या गोष्टी पडताळून पाहण्यासाठी मी दुसऱ्या भावाच्या सातत्याने संपर्कात होतो. इतर लोक ज्यांच्याबद्दल मी लिहिलंय, उदाहरणार्थ माझे शिक्षक, त्यांच्यापैकी फार कोणी आता अस्तित्वात नाही. पण अलिगढ विद्यापीठातील प्रोफेसर मुनीर यांनी ते वाचलं आणि त्यांना ते आवडलं. नैनीतालच्या सेंट जोसेफ शाळेतील माझे सहकारी आत्मचरित्राबद्दल नाराज होते. त्यांच्या मते मी शाळेबद्दल थोडं बरं लिहायला हवं होतं. पण भूतकाळातल्या सगळ्याबद्दलच आपण चांगलं बोललंच पाहिजे असं नाही. त्या शाळेत अक्षरश: अत्याचार होत होते. मला आजही त्या दिवसांबद्दल विचार केला, तर तेथील आयरिश शिक्षकांबद्दल, त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीबद्दल, वागण्याच्या पद्धतीबद्दल तिरस्कार वाटतो. त्याव्यतिरिक्त सगळ्यांनीच या पुस्तकाचं स्वागत केलं. पुस्तकाबद्दल छापून आलेली परीक्षणंही चांगली होती. एक तर इतकं छान होतं की त्यात म्हटलं होतं, ‘हे पुस्तक एवढं छान आहे की, नसिरुद्दीन शाह यांनी लिहिल्यासारखं वाटतच नाही.’ हा अभिप्राय मला सर्वात जास्त आवडला. (हशा)

खालिद मोहम्मद – शबाना आझमीशी बोलताना आत्मचरित्राचा विषय निघाला. त्या वेळी तिने सांगितलं की, या पुस्तकात तू तिच्याबद्दल चांगलं लिहिलंस म्हणून तिला धक्का बसला होता. असं का?

* नसिरुद्दीन शाह – मला काय माहीत असं का? म्हणजे शबाना मला नेहमी म्हणते की, सगळीकडे मी माझ्या आवडत्या अभिनेत्यांमध्ये तुझं नाव घेते. पण तू कधीच माझं नाव घेत नाहीस. आता यावर काय बोलणार! माझ्यासाठी शौकत आपा तिच्याआधी येतात.

खालिद मोहम्मद – हो, तिने एकदा म्हटलंपण होतं की मी नसीरला विचारलं ‘तुला माझ्या अभिनयाबद्दल काय वाटतं? एक अभिनेत्री म्हणून तू माझ्याबद्दल काय सांगशील?’ त्यावर तू तिला एवढंच म्हणालास की, तू शौकत आपांची मुलगी आहेस.

* नसिरुद्दीन शाह – अर्थात! आता हे बघ, शबानाला तू खूप चांगली अभिनेत्री आहेस, हे सांगणं किती स्वाभाविक आहे. ते मी का सांगावं? तिचा अभिनय मला खूप आवडतो. ती प्रचंड ताकदीची अभिनेत्री आहे. माझ्या आत्मचरित्रातही मी तिच्याबद्दल चांगलंच लिहिलं आहे. अभिनय करताना तिच्या मनात पाश्र्वसंगीत वाजत असतं, असं मी लिहिलंय, म्हणून ती कदाचित दुखावली असण्याची शक्यता आहे.

खालिद मोहम्मद – सई, या आत्मचरित्रात एखाद्या गोष्टीबद्दल आणखी काही लिहून यायला हवं होतं, असं वाटतं का?

* सई परांजपे – नाही.. अगदीच नाही. पण हं, मगाशी तू विचारलंस की, या पुस्तकातील मला आवडलेली गोष्ट कोणती! तर नसिरचं त्याच्या वडिलांबरोबरचं नातं! मला वाटतं ते खूप विस्मयकारक, सुंदर, अनवट आणि बहुपेडी आहे. त्या बाबतीत मी नक्की सांगू शकेन की, नसिरला त्या सगळ्या प्रसंगांतून नेमकं काय म्हणायचं आहे, यात दडलेला अर्थ मला गवसला आहे. नसिर, मला तुझ्या वडिलांना भेटायला नक्कीच आवडलं असतं.

खालिद मोहम्मद – नसिर, या पुस्तकाच्या निमित्ताने झालेल्या एका पत्रकार परिषदेत तू म्हणाला होतास की, कंटाळा या प्रकारातून पुस्तकाचा जन्म झाला आहे.

* नसिरुद्दीन शाह – अं.. अगदीच तसं नाही. कंटाळ्यातून म्हणजे लिहिण्याच्या कंटाळ्यातून नाही. पण दुसऱ्या बाबतीत मी खूप कंटाळलो होतो. मी प्रागमध्ये एका अत्यंत कंटाळवाण्या आणि सुमार चित्रपटाचं चित्रीकरण करत होतो. ते थंडीचे दिवस होते. त्या दिवसांमध्ये सूर्य दुपारी तीन वाजताच गुडूप होतो आणि अंधार पडतो. प्रचंड धुकं, बर्फ असं उदासवाणं वातावरण असतं. त्या वेळी माझ्या मनावरही काजळी जमली होती. ती दूर करण्यासाठी मी भूतकाळातील आठवणींमध्ये रमत होतो. त्या आठवणी लिहायला घेतल्या, त्या वेळी त्या पुस्तकरूपात आणाव्यात असं कधीच वाटलं नाही. ते श्रेय रामचंद्र गुहा या माझ्या मित्राला द्यायला हवं. तो स्वत: मोठा इतिहासकार आहे. मी नवाब ऑफ पतौडी या विषयावर एक लेख लिहिला होता. तो वाचून त्याने माझी प्रशंसा करायला फोन केला आणि मला विचारलं की आणखी काही लिहिलं आहेस का! त्या वेळी मी या आठवणींची शंभरएक पानं त्याला वाचायला दिली. त्याला ती आवडली आणि त्याने प्रोत्साहन दिलं आणि हे पुस्तक पूर्ण झालं.

खालिद मोहम्मद – या पुस्तकापुढील तुझं आयुष्य पुस्तकरूपात येणार का?

* नसिरुद्दीन शाह – मला नाही वाटत. कारण माझ्या आयुष्यातला सर्वात रंजक भाग या पुस्तकातच आहे. त्यापुढे म्हणजे मग मी ही फिल्म केली, मी ती फिल्म केली.. एवढंच उरतं. त्यात काहीच नवीन नाही आणि त्यातून लोकांना काही मिळेल असं मला वाटत नाही. पण काही लिहायचं झालं, तर मग गेली ४० र्वष मी ज्या इंडस्ट्रीत काम करतोय, त्याचं शब्दरूप अर्कचित्र काढायला मला नक्कीच आवडेल. पण ते आमच्या क्षेत्रातल्या अनेकांना कितपत रुचेल, हे माहीत नाही.

खालिद मोहम्मद – ट्विटर आणि पुस्तक यांचा विचार केला, तर आज ट्विटरवर तुम्ही एखादं प्रवाहाविरोधातलं मत मांडलं, तर तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात येता. पण पुस्तकात तेच मत मांडलं, तर त्याला प्रसिद्धी मिळायला वेळ लागतो.

* नसिरुद्दीन शाह – खरं सांगायचं, तर मला ट्विटरबद्दल काहीच माहिती नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मी ट्वीट काय असतं, तेदेखील पाहिलं नाही. त्यामुळे त्याबाबत बोलायचा प्रश्न उद्भवत नाही. माझ्या काही मतांबाबत तिथे उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या, एवढं ऐकतो. पण राजेश खन्नाबाबतच्या त्या मतांबद्दल मी आजही ठाम आहे.

खालिद मोहम्मद – आता तू लेखक आहेस. तर मग प्रकाशक आणि लेखक यांच्या नात्याबद्दल काय सांगशील?

* नसिरुद्दीन शाह – मला अजूनही कळत नाही की, लेखक जगतात कसे! म्हणजे त्यांना मिळणारा मोबदला इतका अल्प असतो की, त्यावर त्यांची गुजराण होणं अशक्य आहे. पण सुदैवाने मला खूप चांगले प्रकाशक मिळाले. पण म्हणून मी लेखक म्हणून जगू शकत नाही.

खालिद मोहम्मद – सई, लेखक नसिर आणि अभिनेता नसिर या दोहोंबद्दल तुम्ही काय सांगाल?

* सई परांजपे – अरे बाप रे.. अभिनेता नसिरबद्दल मी काय बोलू..

* नसिरुद्दीन शाह – मी सांगतो.. अभिनेता म्हणून नसिर तिला नेहमीच आवडत आला आहे. कारण आतापर्यंत ती मला फक्त एकदाच ओरडली आहे. तेदेखील कथा या चित्रपटाच्या डबिंगच्या वेळी! बाकी कधी मी तिला संधी दिलीच नाही.

* सई परांजपे – अरे बाप रे.. तुला एवढं आठवतंय? आय्म टच्ड्! पण खरंच नसिरसारखा अभ्यासू अभिनेता लाभणं खूप भाग्याचं आहे. ‘स्पर्श’च्या वेळी त्याने मला सांगितलं होतं की, त्याला त्या अंधांच्या संस्थेतील मुख्याध्यापकांना जवळून पाहायचंय. त्यासाठी तो त्या संस्थेत जाऊन दहा दिवस राहिला होता. आम्ही दहा दिवसांनी चित्रीकरणासाठी गेलो, त्या वेळी ते संचालक अक्षरश: काकुळतीला येऊन मला सांगत होते की, तुमच्या हिरोला आवरा. तो सतत माझ्या मागेमागे फिरतोय. गमतीचा भाग बाजूला सोडा, पण त्या चित्रपटात नसिरने खरंच लाजवाब काम केलंय.

* नसिरुद्दीन शाह – खरं आहे. संहिता वाचल्या वाचल्या सईने मला सांगितलं की, यात तू अजिबात काळा चष्मा लावायचा नाही. ते माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. कारण माझ्या मते आतापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीत आंधळ्यांचे काम कोणत्याही अभिनेत्याने चांगलं केलेलं नाही. मी माझ्याभोवती अनेक दृष्टिहीन लोक पाहिले होते. त्यांच्यात वावरलो होतो. अलिगढ विद्यापीठात तर एका दृष्टिहीन मित्राने इंग्लिश ऑनर्समध्ये पहिला क्रमांक मिळवला होता. त्यामुळे त्यांच्या वावराबद्दल माहिती होतं. तेच मी ‘स्पर्श’मध्ये दाखवलं.

खालिद मोहम्मद – नासिर, आतापर्यंत हिंदीत आंधळ्याचं काम कोणीच समर्थपणे केलं नाही, याबाबत मी तुझ्याशी सहमत नाही. ‘दिदार’मध्ये दिलीप कुमार यांनी..

* नसिरुद्दीन शाह – अजिबात नाही.. मी अजूनही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. दिलीपसाबनाही ते काम जमलेलं नाही! यात कोणताही वाद ओढवून घेण्याची खुमखुमी नाही.

खालिद मोहम्मद – माझा शेवटचा प्रश्न रत्ना पाठक-शहा यांना आहे. नसिर कधी त्याचं काम घरीही वागवतो का? लेखनाचं कामही त्याने तसंच केलं का?

* रत्ना पाठक-शाह – हो तर! तो त्याच्या भूमिकांची तालीम करताना कधी कधी त्याच्याच तंद्रीत असतो. लेखन करतानाही तो त्याच तारेत होता. पण म्हणून, ‘बघा रे, मी लेखन करतोय. मला अजिबात त्रास देऊ नका’, छाप असं त्याने काहीच केलं नाही. त्यामुळे त्याची लेखनप्रक्रिया आमच्यासाठीही सुलभ होती.

खालिद मोहम्मद – पण नसिरच्या या आत्मचरित्राला तू काय रेटिंग देशील? तू खूश आहेस का?

* रत्ना पाठक-शाह – अर्थातच! त्याच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्याच गोष्टी मी अनेकदा ऐकल्या आहेत. पण वाचताना त्या तेवढय़ाच ताज्यातवान्या वाटत होत्या. हे पुस्तक मी एका झपाटय़ात वाचलं आहे. त्याला काहीतरी सांगावंसं वाटलं आणि त्यासाठी लेखणी हातात घ्यावीशी वाटली, हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. माझ्यासाठीच नाही, तर आमच्या क्षेत्रातल्या अनेक नवोदितांसाठीही! आज एखाद्या अभिनेत्याने तयारीसाठी काय करावं, हे सांगणारं एकही पुस्तक आपल्याकडे नाही. स्त्रियांसाठी तर नाहीच नाही. पण नसिरचं हे पुस्तक आमच्यासारख्यांना दिशा देणारं ठरणार आहे, यात वाद नाही.