लॉकडाउनमुळे मनोरंजनउद्योग पार ठप्प पडला आहे. कुठलाही चित्रपट, मालिका, जाहिरात कसलेही चित्रीकरण सुरु नाही. मात्र या निर्बंध असलेल्या वातावरणातही अभिनेता नसीरूद्दीन शाह यांच्या नाटकांचे प्रयोग सुरु आहेत. ते आपल्या कुटुंबियांसोबत घरातच शेक्सपिअरच्या नाटकांचे प्रयोग करत आहेत.

IANSला दिलेल्या मुलाखतीत नसीरूद्दीन शाह म्हणाले, “लॉकडाउनचा काळ मी खूपच आनंदाने घालवत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून न मिळालेला निवांत मला लॉकडाउनमुळे मिळाला आहे. धावत्या आयुष्यात जी पुस्तक वाचायची राहून गेली ती पुस्तक मी वाचत आहे. काही गाजलेले चित्रपट पुन्हा एकदा पाहात आहे. विशेष म्हणजे कित्येक वर्षानंतर मी किचनमध्ये पुन्हा एकदा पाऊल ठेवले आहे. घरात एक स्वयंपाकगृह देखील आहे, हे मी लग्न झाल्यावर विसरुनच गेलो होतो. परंतु लॉकडाउनमुळे माझी पावलं त्या हरवलेल्या खोलीच्या दिशेने वळली.”

नसीरूद्दीन शाह भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांवर त्यांनी आपल्या अफलातून अभिनयाची छाप सोडली आहे. ‘जाने भी दो यारो’, ‘मासूम’, ‘सरफरोश’, ‘अ वेनस्डे’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात देखील आले आहे.