एखादा चित्रपट कथा, कथेतील पात्र, कलावंताचा अभिनय, संगीत यासह अन्य काही तांत्रिक गोष्टींमुळे एका विशिष्ट उंचीवर पोहोचतो. मात्र ही उंची तशीच राहण्यासाठी किंबहुना ती वाढविण्यासाठी स्थळ आणि काळाचे भान देणारे कला दिग्दर्शन या सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. त्यात जर ऐतिहासिक विषयांवर एखादा चित्रपट येत असले तर तो काळ उभा करणे हे कला दिग्दर्शकासमोर आव्हान असते. हे आव्हान ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाच्या माध्यमातून नाशिकच्या ‘सलोनी’ने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने समर्थपणे पेलले आहे.
‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट ‘पिंगा गं पोरी पिंगा’, ‘मल्हारी’ या गाण्यांसह काही प्रसंगांवरील आक्षेपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काशीबाई आणि मस्तानी यांची भेट झाली कधी? त्यांच्यात स्नेहपूर्ण संबंध होते का? काशीबाईंचे नृत्य कौशल्य यासह गाण्याच्या बोलावरही अनेकांनी विरोध दर्शविला. चित्रपटाच्या प्रदर्शनावरही वादाचे सावट आहे. मात्र चित्रपटाचे काही प्रसंग, गाणे पाहिले की, त्यात उभारलेले भव्यदिव्य असे इतिहासकालीन सेट सर्वाचे लक्ष वेधून घेतात. या सेटच्या निमिर्तीत नाशिकच्या सलोनी धात्रक हिचा सहभाग आहे. सलोनीने रायक्ष विज्ञान महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईत वास्तुविशारदची पदवी घेतली. पारंपरिक वास्तुशास्त्राऐवजी व्यापक स्तरावर या क्षेत्रात काम करण्याची तिची मनस्वी इच्छा होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने मुंबई येथे ‘एमएमआरडीए’मध्ये कनिष्ठ नगर नियोजनकार म्हणून काम केले. यातून उत्पन्न सुरू झाले असले तरी काम करण्याचे समाधान नव्हते. स्वतचे असे काही हवे या विचाराने तिने दिवंगत दिग्दर्शक समीर चंदा यांच्याकडे काम करण्यास सुरुवात केली.
कला दिग्दर्शक साहाय्यक म्हणून चंदा यांच्याकडे सुरू झालेला प्रवास दहा वर्षांत संजय लीला भन्साळी यांच्यापर्यंत आला आहे. या काळात तिने दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यासोबत ‘जोधा अकबर’चे काम पाहिले. यानंतर यारीया, ट्रॉफिक सिग्नल, सनम रे, उलागड्डी यासारखे कलात्मक ऐतिहासिक मोठय़ा बॅनरचे चित्रपट केले. गेल्या दीड वर्षांपासून ती भन्साळी यांच्या समवेत बाजीराव मस्तानीवर काम करत आहे. यासाठी तिला श्रीराम अय्यंगार व सुजित सावंत या सहकाऱ्यांची मदत झाली. चित्रपटाचा विषय ऐतिहासिक असल्याने पेशव्यांच्या इतिहासाचा तिने बारकाईने अभ्यास केला. या अभ्यासामुळे सेटवर अचूकता आणण्यास मदत झाल्याचे तिने सांगितले. भन्साळी यांच्यासह रणवीर, दीपिका, प्रियंका चोप्रा यांनीही तिचे खास कौतुक केले आहे. सिने क्षेत्रात नाशिकचाही विचार व्हावा, यासाठी नाशिकचा गोदाकाठ, मंदिराची पाश्र्वभूमी, किल्ले, वाडे याचा अभ्यास सुरू असून नाशिकसह त्र्यंबकरोड, पेठ, हरसूल, येवल्यामधील काही वाडय़ांवर चित्रपटाचे चित्रीकरण होईल, असा विश्वास तिने व्यक्त केला.
First Published on December 19, 2015 3:12 am