करोना विषाणूमुळे संपूर्ण जगात सध्या भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. २०० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. सर्वसामान्य लोकांपासून अगदी सुरक्षित क्षेत्रात राहणाऱ्या सेलिब्रिटींपर्यंत कोणालाही करोनाने सोडलं नाही. दरम्यान हॉलिवूड अभिनेता एलन गारफील्ड यांचा करोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

८० वर्षीय एलन गारफील्ड हॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेता होते. एबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार त्यांना २८ मार्च रोजी करोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्यांचे शरीर डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. अखेर १२ दिवसांच्या संघर्षानंतर नऊ मार्चला त्यांचा मृत्यू झाला.

एलन गारफील्ड हॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीत ‘हाय मॉम’, ‘क्राय अंकल’, ‘द फ्रंट पेज’, ‘द कॉटन क्लब’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी काही कार्टून चित्रपटांना देखील आवाज दिला होता. एलन गारफील्ड यांच्या मृत्यूमुळे हॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियाव्दारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.