‘शाळा’, ‘अजोबा’, ‘फुंतरु’ अशा नावाजलेल्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार तरुण चित्रपट दिग्दर्शक सुजय डहाके लवकरच वेबसिरीजच्या विश्वात पदार्पण करत आहे. ‘सेक्स,ड्रग्ज & थिएटर’ असं सुजयचं पहिल्या वेबसिरीजचं नाव असून या सिरीजच्या निमित्ताने त्याने या सिरीजविषयी त्याचे काही अनुभव ‘लोकसत्ता ऑनलाइन’सोबत शेअर केले आहेत.

आजवर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर रोमॅण्टीक आणि प्रेमकथेवर आधारित चित्रपटांची निर्मिती झाली होती. या साऱ्यामध्ये वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती करण्याचा प्रयत्न सुजयने केला आणि तो यशस्वीही झाला. त्याचा पहिलाच चित्रपट ‘शाळा’ हा प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला. इतकचं नाही तर सुजयला कमी वयात राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. चित्रपटाच्या यशानंतर आणि राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर सुजयने वेबसिरीजच्या विश्वात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र वेबसिरीजची निर्मिती करत असताना सतत राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचं दडपण मनावर होतं असं त्याने यावेळी सांगितलं.

‘वयाच्या २४ व्या वर्षी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. एवढ्या कमी वयात हा पुरस्कार मिळणं ही खरंच फार आनंदाची गोष्ट आहे. पण हा पुरस्कार म्हणजे केवळ तुमचा मान किंवा तुमच्या कामाचं केलेलं कौतुक नाही, तर ती एक जबाबदारी आहे. नव्या चित्रपटाची किंवा वेबसिरीजची निर्मिती करताना कायम या पुरस्काराचं दडपण मनावर येतं. हा पुरस्कार फार मोठी जबाबदारी आहे आणि त्याचा मान राखणं हे पुरस्कारप्राप्त व्यक्तीचं कर्तव्य’, असं सुजयने यावेळी सांगितलं.

पुढे तो असंही म्हणाला, ‘प्रथम मला पुरस्कार मिळाल्याचं माहित नव्हतं. त्यामुळे मला त्याचं खरं महत्वही माहित नव्हतं. पण हा पुरस्कार हातात आल्यानंतर त्याची जाणीव झाली. त्याचा मान किती आहे हे समजलं. तीन चित्रपटांच्या यशानंतर मी आता पहिल्यांदाच वेबसिरीजकडे वळत आहे. चित्रपट आणि सिरीज या दोन्ही संकल्पना वेगळ्या असून त्यांची काम करण्याची पद्धतही वेगळी आहे. वेबसिरीजची लाट आली म्हणून ती केली असं कधी होत नाही. सिरीज करायला बराच कालावधी लागतो. ही सिरीज लिहीण्यासाठी मला तब्बल दोन वर्षाचा कालावधी लागला त्यानंतर ही सिरीज साकार झाली.

दरम्यान, ‘सेक्स,ड्रग्ज & थिएटर’ ही सिरीज ६ कॉलेज विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारीत असून त्यांना प्रसिध्द अशा नाट्य स्पर्धेत भाग घ्यावा लागल्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय नाट्य घडते हे या मालिकेत पाहायला मिळेल. १० भागांची ही मालिका असून यामध्ये नवीन तरुण कलाकारांचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे या सिरीजनंतर लगेचच २०१९मध्ये सुजयचे दोन नवीन चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.