राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘दशक्रिया’ या चित्रपटाला ब्राम्हण महासंघासह पैठणच्या पुरोहित संघानेही विरोध दर्शवला आहे. या दोन्ही संघटनांकडून चित्रपटाच्या कथानकावर आक्षेप घेण्यात आला होता. ब्राह्मण आणि हिंदू परंपरांचा अपमान केल्याचे सांगत ब्राह्मण महासंघाने याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

पैठण, ब्राम्हण आणि संतांविषयी या चित्रपटातून चुकीच्या पद्धतीने भाष्य करण्यात आलेय. याचा निषेध म्हणून पैठण येथील मोक्षघाटावर शुक्रवारी सकाळपासून पुरोहितांनी दशक्रिया विधी करणे बंद केले होते. यावेळी सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने शहरातील शिवाजी चौकात निदर्शनेही करण्यात आली.

EXCLUSIVE : याआधी आमच्यासाठी भांडलात का? योगेश सोमण यांचा रवी जाधवांना सवाल

या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘दशक्रिया’विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, औरंगाबाद खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. ‘या ब्राम्हणांनी आपले पोट चालवण्यासाठी हे व्यवसाय सुरू केले आहे…’ चित्रपटातील या संवादावर संघटनांचा आक्षेप होता. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत पुरोहितांनी हा बंद पुकारला होता. पण, आता मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यामुळे ‘दशक्रिया’ विधी पुन्हा सुरु करणार असल्याचे पुरोहितांनी स्पष्ट केले. त्यानुसार दुपारी १२ वाजल्यापासून दशक्रिया विधींना पुन्हा प्रारंभ झाला. मात्र, तोपर्यंत औरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगर जिल्ह्यांतून आलेल्या लोकांना ताटकळत बसावे लागले. त्यामुळे या लोकांनी संताप व्यक्त केला.

वाचा : ‘पुरस्कार मिळूनही चित्रपटाला विरोध म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला’

या सर्व प्रकरणात चित्रपटाच्या बाबतीत एका दिवसात निर्णय देणे शक्य नसल्याचे सांगत न्यायालयाने हस्तक्षेप करणे टाळले. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. मात्र न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. औरंगाबाद येथील प्रोझोन मॉलच्या चित्रपटगृहात ‘दशक्रिया’चा पहिला शो प्रदर्शित होत आहे.