काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली वेबसीरीज ‘बॉम्बे बेगम्स’ ही वेबसीरीज आता अडचणीत आली आहे. राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने ह्या सीरीजचं स्ट्रिमिंग थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने या सीरीजमधल्या काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. गुरुवारी या आयोगाने एक नोटीस जारी केली आहे. यात त्यांनी या सीरीजच्या निर्मात्यांना आपला तपशीलवार अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. २४ तासांच्या आत हा अहवाल सादर केला नाही तर आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही या नोटिसमध्ये दिला आहे. या सीरीजमध्ये लहान मुलांशी संबंधित काही दृश्ये अशी आहेत की, ज्याने मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतील. लहान मुलांना या सीरीजमध्ये चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. याचा परिणाम लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचार आणि शोषणामध्ये होऊ शकतो असं या आयोगाचं म्हणणं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja B (@poojab1972)

या सीरीजमध्ये लैगिंक कृतींमध्ये आणि ड्रग्स प्रकरणात अल्पवयीन मुलांच्या सहभागाचं सामान्यीकरण करण्यात आल्याचं बालहक्क संरक्षण आयोगाचं म्हणणं आहे.

“नेटफ्लिक्सने अल्पवयीन मुले आणि त्यांच्याबद्दलचा कोणताही आशय प्रदर्शित करताना जास्त काळजी घ्यायला हवी. याबद्दल योग्य ती कृती लवकरात लवकर करण्यात यावी आणि या वेबसीरीजचं स्ट्रिमिंग लवकरात लवकर थांबवण्यात यावं. तसंच २४ तासांमध्ये कृती अहवाल सादर करावा. हा अहवाल सादर न केल्यास बालहक्क संरक्षण कायद्याच्या कलम १४ अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल”, असं आयोगाने या नोटिसमध्ये म्हटलं आहे.

‘बॉम्बे बेगम्स’ या वेबसीरीजमध्ये समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांमधल्या ५ स्त्रियांची आयुष्ये दाखवली आहेत. त्या भोवतीच या वेबसीरीजचं कथानक फिरतं.