‘चुप चुप खडे हो जरूर कोई बात हैं’ हे जुन्या काळी प्रचंड गाजलेले गाणे असलेला ‘बडी बहन’ हा १९४९ मधला चित्रपट राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या संग्रहात समाविष्ट झाला आहे.

पुण्यातील जुने चित्रपट वितरक बाबूराव पै यांच्या स्नुषा राधिका पै यांनी या चित्रपटाची एक ‘निगेटिव्ह’ प्रत ‘एनएफएआय’चे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्द केली. बाबूराव पै यांनी प्रथम कराचीमध्ये चित्रपट वितरणासाठी कार्यालय सुरू केले होते. नंतर ते सरस्वती सिनेटोन आणि प्रभात फिल्म कंपनीमध्ये भागीदार होते. पुढे त्यांनी ‘फेमस पिक्चर्स’ या नावाने स्वत:ची निर्मिती संस्था सुरू केली. ‘बडी बहन’ ही या संस्थेची पहिली निर्मिती आहे, अशी माहिती ‘एनएफएआय’तर्फे देण्यात आली.

डी. डी. कश्यप यांनी या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले होते. अभिनेत्री सुरैय्या आणि गीता बाली या चित्रपटात बहिणींच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासह रेहमान, उल्हास, प्राण आणि बेबी तबस्सुम यांच्याही चित्रपटात भूमिका होत्या. हुस्नलाल-भगतराम यांनी या चित्रपटास दिलेले संगीत विशेष लोकप्रिय झाले होते. राजिंदर कृष्णा आणि कमार जलालाबादी यांनी गीतांचे बोल लिहिले होते. ‘चुप चुप’ हे प्रसिद्ध गाणे ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी गायले आहे.