News Flash

माहिती प्रसारण मंत्रालयावर संतापले मराठी कलाकार

वर्षांनूवर्षे याच तारखेला पुरस्कार सोहळा होत असूनही जर तीन तास राष्ट्रपती देऊ शकत नसतील तर हा समस्त भारतीय कलेचा अपमान आहे

प्रसाद ओक, मंदार देवस्थळी

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण होणार आहे. पण या वितरणावर अनेक कलाकारांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे झाले असे की, राष्ट्रीय पुरस्कार हे राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येतात. पण यंदा हे पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे विजेत्या कलाकारांनी पुरस्कारांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

‘न्युज१८ लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद ओक आणि मंदार देवस्थळी यांनी या सावळ्या गोंधळाबद्दल नाराजी व्यक्त केली. कच्चा लिंबू’ सिनेमाचा दिग्दर्शक प्रसाद यावेळी म्हणाला की, ‘राष्ट्रीय पुरस्काराचं स्वप्न घेऊन प्रत्येक कलाकार काम करत असतो. भारतातील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये या पुरस्काराचा समावेश असतो. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार घेतानाचा क्षण अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा असतो. पण तोच क्षण जर डावलला जात असेल तर ही वागणूक अपमानास्पद आहे असं वाटतं. सगळे मिळून जर पुरस्कार सोहळ्याला बहिष्कार घालणार असतील तर मीही त्यांच्यासोबत आहे.’

‘कच्चा लिंबू’ सिनेमाचे पोस्टर

‘कच्चा लिंबू’ सिनेमाचे निर्माते मंदार देवस्थळीनेही यावेळी या पुरस्कार सोहळ्यावर नाराजी व्यक्त करत म्हटले की, ‘आतापर्यंत जी प्रथा सुरू होती ती याच वर्षी अचानकपणे मोडण्याचं काय कारण आहे असा प्रश्न आम्हाला पडला आहे. आम्हाला यासंदर्भात पूर्वकल्पना देण्यात आली असती तर आम्ही आमची मानसिक तयारी केली असती. पण तेही आम्हाला सांगण्यात आले नाही. जर आता राष्ट्रपती या पुरस्कार सोहळ्याला १ तास देत असतील तर त्या एका तासात आम्ही सगळे पुरस्कार स्वीकारायला तयार आहोत. भाषणं आणि इतर कार्यक्रम रद्द करण्याची सर्वांचीच तयारी आहे. पण त्यावर अजून काही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणं हा आमचा आणि कलेचा मान आहे असं आम्ही समजतो. पण जर आधीच तारीख ठरलेली असून वर्षांनूवर्षे याच तारखेला पुरस्कार सोहळा होत असूनही जर तीन तास राष्ट्रपती देऊ शकत नसतील तर हा समस्त भारतीय कलेचा अपमान आहे असे मला वाटते.’

यंदा व्यग्र कारभारामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. ते संपूर्ण सोहळ्यात जरी उपस्थित राहू शकणार नसले तरी ११ पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे. पण नेमकी कोणते पुरस्कार ते देणार हे अजून गुलदस्त्यातच आहे. सर्वसामान्यपणे तांत्रिक पुरस्कार आधी देण्यात येतात. या पुरस्कारांनंतर मुख्य पुरस्कारांचे वितरण होते. आता राष्ट्रपती नेमके कोणते पुरस्कार देणार आहेत हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 2:25 pm

Web Title: national film awards 2018 president ram nath kovind to present only 11 honours awardees may boycott ceremony prasad oak mandar devasthali express their views
Next Stories
1 शाही विवाहसोहळ्याचा वाद चव्हाट्यावर; लग्न मोडण्यासाठी मेगनच्या भावाने लिहिलं खळबळजनक पत्र
2 ‘भाभीजी घर पर है’ मालिकेतील कलाकारांचं मानधन ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!
3 सोनम लग्नात कोणता ड्रेस घालणार समजलं का ?
Just Now!
X