News Flash

National Film Awards 2019: मराठमोळ्या पल्लवी जोशी यांना अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

आज दिल्लीमध्ये या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली

फोटो ट्विटरवरुन साभार

अभिनेत्री आणि लोकप्रिय सूत्रसंचालक पल्लवी जोशी यांना अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय. आज दिल्लीमध्ये जाहीर झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पल्लवी जोशी यांना जाहीर झालाय. भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूवरील प्रश्नांवरआधारित ‘द ताश्कंद फाइल्स’ या चित्रपटातील भूमिकेसाठी पल्लवी यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. मिथुन चक्रवर्ती, नसिरुद्दीन शाह, पंकज त्रिपाठी, विनय पाठक, मंदिरा बेदी, पल्लवी जोशी, श्वेता बसू, अंकुर राठी आणि प्रकाश बेलवडी अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात असतानाही पल्लवी यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. अनेक चित्रपट समिक्षकांनी पल्लवी यांच्या अभिनयाचं कौतुक केल्याचं पहायला मिळालं.  आज राष्ट्रीय पुरस्काराच्या रुपाने पल्लवी यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीत मानाचा तुरा खोवण्यात आलाय.

२०१९ सालांमधील कलाकृतींसाठीच्या पुरस्कारांची घोषणा आज दिल्लीमध्ये कऱण्यात आली. या पुरस्कारांची घोषणा मागील वर्षी मे महिन्यामध्ये होणं अपेक्षित होतं मात्र माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने करोनाच्या पार्श्वभूमीवर या पुरस्कारांची घोषणा पुढे ढकलली होती. अखेर आज दिल्लीमध्ये या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून  कंगना रणौतला तर सर्वोत्तम अभिनेता हा पुरस्कार मनोज बाजपेयी आणि धानुषला विभागून देण्यात आलाय. तर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री म्हणून पल्लवी जोशी यांना पुरस्कार जाहीर झाला असून ‘द ताश्कंद फाइल्स’मधील आएशा अली शाह यांच्या भूमिकेसाठी पल्लवी यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन पल्लवी यांचे पती दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. २०१९ मध्ये १२ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

पल्लवी यांचा आतापर्यंतचा प्रवास

आपल्या अभिनयाने आणि मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे तिने चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणाऱ्या पल्लवी जोशी यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात बालपणीच झाली. पल्लवी जोशी यांनी बालपणीच रंगमंचावर काम करणे सुरु केले. बाल कलाकार म्हणून ‘बदला’ आणि ‘आदमी सडक का’ या दोन चित्रपटात त्यांनी अभिनय केला. १९७९ साली प्रदर्शित झालेल्या ‘दादा’ या चित्रपटात एका कुविख्यात गुंडाला सुधारणाऱ्या अंध मुलीची भूमिका छोट्याश्या पल्लवीने साकारली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. झी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या अंताक्षरी या कार्यक्रमामुळे पल्लवी घराघरात पोहोचल्या. त्या कार्यक्रमात अनु कपूर यांच्यासह सूत्रसंचालन केलं होतं. त्यानंतर त्यांनी सारेगमप लि’ल चॅम्प्सचे ही सूत्रसंचालन केलं.

पल्लवी यांनी विवेक अग्निहोत्री यांच्याशी विवाह केला. विवेक अग्निहोत्री यांनी ‘चॉकलेट’, ‘हेट स्टोरी’, ‘बुद्धा इन ट्रॅफिक जाम’,‘द ताश्कंद फाइल्स’ यासरख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. पल्लवी आणि विवेक यांना दोन मुले आहेत. पल्लवी यांनी कारकिर्दीच्या सुरूवातीलाच ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी आणि शबाना आझमी यांच्यासोबत ‘भारत एक खोज’ या मालिकेत काम केलं आहे. मधल्या काळात पल्लवी यांनी काही जाहिरातींमध्ये काम केलं. त्यांच्या पतीने दिग्दर्शित केलेल्या ‘बुद्धा इन ट्रॅफिक जॅम’ या चित्रपटातही काम केलं आहे. पल्लवी यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला. ‘अल्पविराम’ या मालिकेतील त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक करण्यात आलं. पल्लवी यांनी ‘असंभव’ आणि ‘अनुबंध’ या ‘झी मराठी’वरील दोन मालिकांची निर्माती म्हणून काम पाहिले. या दोनही मालिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. या दोन्ही मालिका त्या काळात चांगल्याच गाजल्या होत्या.

‘द ताश्कंद फाइल्स’ विषयी थोडक्यात

ताश्कंद डिक्लरेशन’ ऊर्फ ‘ताश्कंद अ‍ॅग्रिमेंट’ हा शांतता करार भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे १० जानेवारी १९६६ रोजी केला गेला. सोव्हिएत युनियनचे प्रमुख अलेक्सी कोसिजीन यांच्या मध्यस्थीने झालेल्या करारावर भारत सरकारच्या वतीने पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी, तर पाकिस्तानच्या वतीने पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी सह्य़ा केल्या. ताश्कंदच्या या शांतता कराराची औपचारिकता पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी, ११ जानेवारी १९६६ रोजी भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे अकस्मात निधन झाले. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या घडामोडींचं चित्रण ‘द ताश्कंद फाइल्स’ मध्ये करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 6:40 pm

Web Title: national film awards 2019 pallavi joshi win best supporting actress for the tashkent files scsg 91
Next Stories
1 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : मनोज बाजपेयी आणि धनुष सर्वोत्कृष्ट अभिनेता
2 ६७व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्येही ‘आनंदी गोपाळ’ या मराठी सिनेमाची वर्णी
3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्करांवर ‘तेरी मिट्टी मे मिलजावा’ गाण्याची छाप
Just Now!
X