रितेश देशमुखच्या ‘लय भारी’चा विक्रम मोडीत

नववर्षाचा मुहूर्त साधत प्रदर्शित झालेल्या, नाना पाटेकर यांच्या अस्सल अभिनयाने रंगलेल्या ‘नटसम्राट’ या चित्रपटाने आत्तापर्यंत ३५.१० कोटींचा गल्ला जमवून मराठी चित्रपटसृष्टीत नवा विक्रम केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून रितेश देशमुखची मुख्य भूमिका असलेल्या ‘लय भारी’ या चित्रपटाची नोंद होती, परंतु सर्वाधिक कमाईचा हा मान आता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘नटसम्राट’ या चित्रपटाला मिळाला आहे.

पहिल्या आठवडय़ात १० कोटी रुपये आणि तिसरा आठवडा पूर्ण होईपर्यंत ३० कोटी रुपयांचा जादुई आकडा नटसम्राटने पार केला होता. दुसऱ्याच आठवडय़ात ‘वजीर’ सारखा अमिताभ बच्चन यांचा चित्रपट प्रदर्शित होऊनही ‘नटसम्राट’ची गर्दी कमी झाली नव्हती.‘नटसम्राट असा नट होणे नाही’ हा चित्रपट आता चौथ्या आठवडय़ात प्रवेश करेल, तिसऱ्या आठवडय़ातही पाच मराठी चित्रपटांना मागे टाकत या चित्रपटाची तिकीटबारीवरची घोडदौड कायम आहे. चौथ्या आठवडय़ातही १७५ चित्रपटगृहांमधून चित्रपट दाखवला जात आहे. त्यामुळे या महिना अखेरीस हा चित्रपट स्वत:चा नवा विक्रम कायम करेल, अशी अटकळ चित्रपटसृष्टीत बांधली जात आहे.