कुसूमाग्रजांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘नटसम्राटा’ने रंगभूमीवर अनेक वर्ष गारूड केले आहे. आजही या नाटकाची आठवण निघाली की ज्यांनी हे नाटक पाहिले आहे ते भरभरून बोलतात. मात्र हाच ‘नटसम्राट’ रंगभूमीवरची किमया रुपेरी पडद्यावर करू शकेल का?, या प्रश्नाला अवघ्या तीन दिवसांत दहा कोटी रुपयांचा आकडा पार करण्याएवढा प्रतिसाद रसिकांकडून मिळाला आहे. नव्या वर्षांतील पहिल्याच आठवडयात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तीन दिवसांत तिकीटबारीवर दहा कोटी रुपयांची कमाई केली आहे. याआधी ‘लय भारी’ या चित्रपटाने पहिल्या आठवडय़ात १०.५५ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली होती.

‘नटसम्राट – असा नट होणे नाही’ हा महेश मांजरेकर दिग्दर्शित मराठी चित्रपट नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशी राज्यभर प्रदर्शित झाला. नाना पाटेकरांची मुख्य भूमिका असलेला हा एकमेव चित्रपट राज्यभरात ४०० चित्रपटगृहे आणि दिवसाला १६०० शोजमधून दाखवला जातो आहे. ‘नटसम्राट’ या नाटकाचा प्रभाव अजूनही लोकांवर आहे, मात्र चित्रपट स्वरूपात पाहताना अशा गंभीर नाटय़पूर्ण चित्रपटाला प्रेक्षकांचा एवढा भरभरून प्रतिसाद मिळेल, असे वाटले नव्हते. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह सगळीकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती ‘झी स्टुडिओज’चे संस्थापक नितीन केणी यांनी दिली. गेल्या पाच वर्षांमध्ये नविन वर्षांच्या पहिल्याच आठवडय़ात मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा पायंडा ‘झी स्टुडिओज’ने पाडला असून अशापध्दतीने वर्षांच्या पहिल्याच शुक्रवारी प्रदर्शित होणारा ‘नटसम्राट’ हा त्यांचा पाचवा चित्रपट ठरला आहे.

नाना पाटेकर यांनी पडद्यावर साकारलेल्या ‘नटसम्राट’ अप्पासाहेब बेलवलकरांचे सगळीकडून कौतूक होते आहे. ‘नटसम्राट’सारख्या अभिजात नाटय़कृतीवर चित्रपट बनवणे हे आपले स्वप्न होते. आपल्या सहकाऱ्यांनी, कलाकारांनी, तंत्रज्ञांनी केलेल्या मेहनतीमुळे हे यश पहायला मिळत असल्याचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांगितले. चांगल्या कलाकृतीला रसिकांकडून दाद मिळते. ‘नटसम्राट’लाही प्रेक्षकांनी ज्याप्रकारे प्रतिसाद दिला आहे ते पाहून आपण भारावून गेलो असल्याचे मांजरेकर यांनी म्हटले आहे. मागच्या आठवडय़ातील तीन दिवस आणि या आठवडय़ात शुक्रवापर्यंतचे पाच दिवस या चित्रपटाची चित्रपटगृहांवरची मक्तेदारी कायम राहणार असल्याने या चित्रपटाला चांगला व्यवसाय करता येईल.