16 December 2017

News Flash

नाटय़छटा : व्यक्त होण्यासाठी साह्य़कारी

प्राथमिक आणि अंतिम स्पर्धेसाठी परीक्षेचा जणू ताफाच निर्माण करण्यात आला होता

श्रीराम ओक | Updated: August 13, 2017 1:11 AM

मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी नाटय़ माध्यमाद्वारे निरनिराळे प्रयोग केले जात असताना ‘नाटय़छटा’ हा प्रकार  जीवित ठेवण्यासाठी ‘नाटय़संस्कार कला अकादमी’चे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी २५ वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू केले.

अभिनय आणि सादरीकरण हा प्रकार लहानांपासून मोठय़ांपर्यंत अनेकांना आवडणारा. चार लोकांसमोर उभे राहून आपण काहीतरी करावे, सर्वाचे लक्ष आपल्याकडे असावे, त्यांना आपल्या बोलण्यात खिळवून ठेवावे इतकेच नाही तर आपण जे काही सादर करू ते झाले की टाळ्या आणि नंतरचेही कौतुक मिळवावे ही अनेकांची मनीषा असते. ही आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी ‘जरा हटके’ असलेला पण सर्वाना आवडेल असा प्रकार म्हणजे ‘नाटय़छटा.’ हा प्रकार कष्टसाध्य असला तरी प्रयत्नांती जमेल आणि सर्वच वयोगटातील मंडळींना करता येईल असा.

मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी नाटय़ माध्यमाद्वारे निरनिराळे प्रयोग केले जात असताना ‘नाटय़छटा’ हा प्रकार  जीवित ठेवण्यासाठी ‘नाटय़संस्कार कला अकादमी’चे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी २५ वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू केले. आपल्या संस्थेच्या माध्यमातून कै. दिवाकर यांच्या स्मृती जागृत राहाव्यात म्हणून त्यांनी  सुरू केलेल्या प्रयत्नांना हळहळू का होईना यश येऊ लागले असून यंदाच्या वर्षी संस्थेमार्फेत घेण्यात आलेल्या स्पर्धेत चौदाशेहून अधिकांनी आपला सहभाग नोंदविला. त्यांच्या या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे नाटय़छटा लेखन आणि सादरीकरणाच्या स्पर्धा घेणे, या दोन्हींसाठी कलाप्रेमींना प्रोत्साहित करणे, त्यांच्यासाठी स्पर्धाचे आयोजन-नियोजन करण्याबरोबरच नाटय़छटांची पुस्तके तसेच त्याचे अभिनव रूप म्हणजे सादरीकरणाच्या डीव्हीडींची निर्मिती, अशा विविध पातळ्यांद्वारे त्यांनी या ‘नाटय़छटा’ कलाप्रकाराची जागृती केली.

शंकर काशिनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांनी ‘नाटय़छटे’ला प्रतिष्ठा मिळवून दिली. ११ सप्टेंबर १९११ रोजी नाटय़छटा लेखनास प्रारंभ केलेल्या दिवाकर यांनी वैविध्यपूर्ण नाटय़छटांमधून सामजिक दोष, अन्यायावर टीका केली.

सुरुवातीला ‘नाटय़प्रसंग’म्हणून लिहिला जाणारा ‘नाटय़छटा’ हा साहित्यप्रकार हाताळायला दिवाकरांना स्फूर्ती मिळाली ती प्रसिद्ध आंग्ल कवी रॉबर्ट ब्राऊनिंग यांच्या ‘मोनोलॉग’ या काव्यप्रकाराच्या वाचनाने. या साहित्यप्रकाराला नाटय़छटा हे नाव दिले प्रा. वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी. सहजता, अकृत्रिमता, नाटय़मयता, नेमकी, नेटकी भाषा, आकर्षक मांडणी, किंचित थट्टा, उपरोध ही दिवाकरांच्या नाटय़छटा लेखनाची वैशिष्टय़े. १९३१ पर्यंत दिवाकरांनी सुमारे एक्कावन्न नाटय़छटा लिहिल्या.  ‘चिंगी महिन्याची झाली नाही तोच’, ‘वर्डस्वर्थचे फुलपाखरू’, ‘फाटलेला पतंग’ अशा वैविध्यपूर्ण नाटय़छटा त्यांनी लिहिल्या.

या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या निमित्ताने सुरू झालेल्या या स्पर्धेत यंदाच्या वर्षीच्या स्पर्धेत पुणे केंद्रातून तब्बल सहाशेहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. यापकी एकशेचोवीस नाटय़छटा प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. स्पर्धेची अंतिम फेरी व बक्षीस समारंभप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, मध्यप्रदेशातील इंदूर येथील मुक्तसंवादचे मोहन रेडगावकर यांच्या हस्ते संध्या कुलकर्णीलिखित ‘नाटय़छटा पंचविशी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी संस्थेचे माजी विद्यार्थी सूरज पारसनीस, तेजश्री वालावलकर, अथर्व कर्वे, चिन्मयी गोस्वामी यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

प्राथमिक आणि अंतिम स्पर्धेसाठी परीक्षेचा जणू ताफाच निर्माण करण्यात आला होता. त्यांच्या सर्वाच्याच सहकार्याने यंदा पार पडलेल्या स्पर्धेसाठी स्पर्धा प्रमुख म्हणून अनुराधा कुलकर्णी यांनी कामगिरी बजावली. स्पर्धेची प्राथमिक फेरी पुण्यातील आठ केंद्रांवर पार पडली. स्पर्धा प्राथमिक फेरीत सहा वेगवेगळ्या गटांत झाल्या आहेत. यामध्ये शिशुगटापासून ते तरुण आणि ज्येष्ठांचा समावेश होता.

पुणे केंद्रातील शिशुगटात श्रीजय देशपांडे, पहिली-दुसरीच्या गटात कौशिकी वझे, तिसरी-चौथीच्या गटात अनाहिता जोशी, पाचवी-सातवीच्या गटात यज्ञा मतकर, आठवी-दहावीच्या गटात शर्व वढवेकर तर खुल्या गटात विद्या ढेकणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. नाटय़छटा लेखनात विद्यार्थी गटात प्रांजला धडफळे तर पालक गटात श्व्ोता देशमुख, शिक्षक गटात नूपुरा किर्लोस्कर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

पिंपरी-चिंचवड विभागातील प्राथमिक फेरीत आठशेपन्नास स्पर्धकांचा सहभाग होता. त्यातील एकशेतीस स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले असून आज (रविवारी) निगडी प्राधिकरण येथील ज्ञान प्रबोधिनीच्या नवनगर विद्यालय येथे ही फेरी होणार आहे. तर बक्षीस समारंभ सायंकाळी सहा वाजता याच शाळेतील मनोहर वाढोकर सभागृहात होणार आहे. या वेळी सहा गटांमधील पहिल्या क्रमांकाच्या नाटय़छटा बघण्याची संधी उपलब्ध होईल. या वेळी पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर शैलजा मोरे तर ज्येष्ठ रंगकर्मी धनंजय सरदेशपांडे उपस्थित राहणार आहेत.

पिंपरी-चिंचवड विभागातील स्पर्धेचं यंदाचं हे तिसरे वर्ष आहे. स्पर्धकांचा वाढता उत्साह पाहता यावेळी सिटी प्राईड, प्राधीकरण हे एक जास्तीचे केंद्र जाहीर करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड विभागातील प्राथमिक फेरी चार केंद्रांवर पार पडली. या विभागासाठी स्पर्धा प्रमुख म्हणून माधुरी ओक यांनी कामगिरी बजावली.

मागील तीन वर्षांपासून मुळशी तालुक्यातील खारवडे येथे देखील केंद्र सुरू झाले आहे. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत आणि औद्योगिक नगरीपासून आयटी क्षेत्रापर्यंत सर्वानाच नाटय़छटा या प्रकाराची आवड निर्माण करणारे कार्य नाटय़संस्कार या संस्थेमार्फत झालेले यानिमित्ताने बघायला मिळते. अजूनही जर या प्रकाराबाबत माहिती नसेल किंवा पुढील वर्षांसाठी या स्पर्धेत सादरीकरण, लेखन करायचे असेल तर १९ ऑगस्ट रोजी पुणे आणि पिंपरी-चिंचवड विभागातील सहाही गटांतील ३६ विजेत्या नाटय़छटा पाहण्याची संधी मिळणार आहे. हा महाअंतिम सोहळा यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे सायंकाळी पाच वाजता होणार असून अत्यल्प शुल्कात तो बघता येईल. याशिवाय २० ऑगस्ट, रविवारी दुपारी एक ते चार या वेळेत नाटय़छटा लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठीदेखील अत्यल्प शुल्कात सहभाग घेता येईल.

नाटय़छटांची माहिती घेतल्यानंतर आणि सादरीकरण, लेखनाची तयारी केल्यानंतर आपल्यातील दडलेल्या कलाकाराला योग्य ती संधी मिळेल हे नक्की.

श्रीराम ओक shriram.oak@expressindia.com

First Published on August 13, 2017 1:11 am

Web Title: natyachata competition for the children personality development